Nashik Crime News : नाशिक बाजार समिती निवडणुकीत राजकारण तापलं, काँग्रेसच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माघार घेतल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीवरुन आता थेट काँग्रेसच्या आमदाराला  जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी दरम्यान इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला होता. विरोधी पॅनलचा प्रचार करत असल्याच्या कारणावरुन त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांनी फोनवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

धमकीच्या फोनमुळे हिरामण खोसकर आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धमकीच्या फोनवरुन घाबरलले आमदार हिरामण खोसकर यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'माझं काहीही बर वाईट होऊ शकतं,निवडणुकीतून माघार घेऊन शेती करेन.' याप्रकरणी आमदार खोसकर यांनी शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, 'आम्ही खोसकरांना कोणतीही धमकी दिली नाही', असा दावा शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. खोसकरांनी धमकी दिल्याचे पुरावे द्यावेत असे देखील शिवाजी चुंभळे यांनी सांगितले. बाजारसमिती निवडणुकीत आमच्या पॅनलचे पारडं जड असल्याने बदनाम करण्यासाठी खोसकरांकडून आमच्यावर हे आरोप केले जात असल्याचे मत चुंभळे यांनी व्यक्त केले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply