Nanded : स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट; मोठी दुर्घटना टळली, कारसह तीन दुकाने जळून खाक

Nanded : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधपणे वापर होत असल्याचे समोर आले आहे. गॅस सिलेंडरमधून कार किंवा रिक्षामध्ये गॅस अवैधरित्या भरला जात असतो. अशाच प्रकारे कारमध्ये गॅस भरताना गॅसचा स्फोट झाला. या स्फोटानंतर कारला आग लागल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. यात तीन दुकाने व एक दुचाकी जळून खाक झाले असून सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे.

अवैधरित्या गॅस रिफलिंग करण्याचे प्रकार सुरूच आहेत. गॅस रिफलिंग करताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र हे प्रकार अजूनपर्यंत थांबलेले नाहीत. प्रामुख्याने प्रवाशी रिक्षांमध्ये अवैधपणे गॅस भरण्याचे काम केले जात असते. तर कारमध्ये देखील याचा अवैध वापर सुरु आहे. यासाठी घरगुती गॅस सिलेंडरचे ब्लॅक मार्केटमध्ये विक्री केली जात असते. असाच प्रकारामुळे नांदेडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.

कार चालक गंभीर जखमी

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील वन्नाळी फाटा येथे रात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली. घटनेत जळून खाक झालेली चार चाकी कार एका इंग्रजी शाळेतील मुलांची ने- आण करीत असते, अशी माहिती आहे. सुदैवाने सोमवारी गॅस भरताना या कारमध्ये कोणीही नव्हते. यामुळे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र या घटनेत कार चालक गंभीररित्या भाजला असल्याची माहिती आहे. विजय जोरगूलवार असे या जखमी कार चालकाचे नाव आहे.

तीन दुकानांना लागली आग

दरम्यान वन्नाळी फाटा येथे गॅस भरण्यासाठी कार चालक कार घेऊन गेला होता. गॅस भरत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. त्यानंतर कारने पेट घेतला. पेट घेतल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. गॅसचा भडका उडाल्याने कारसह आजूबाजूचे दुकाने देखील या आगीत ओढल्या गेले. तीन दुकानांना आग लागली होती. या घटनेत कारसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply