Maharashtra Rain Update : येत्या २४ तासांत विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा “रेड अलर्ट”

Nagpur : राज्यातील अनेक भागात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाकडे पाठ फिरवलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासांत विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा “रेड अलर्ट” दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली असून, ही प्रणाली अंतर्गत भागांच्या दिशेने सरकताना दिसणार आहे. त्यामुळे १९ ते २१ जुलै दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपरनगरांसह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरामध्ये भर दिवसा काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळणार आहे. सातारा, कोल्हापूरासह कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावर दृश्यमानतेवर याचे परिणाम होताना दिसून येतील. दरम्यान, या घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Pune Accident : दुर्दैवी! अंत्यविधी करुन घरी निघाले, वाटेत भरधाव ट्रकने उडवले, पुण्यात तिघांचा मृत्यू

विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा “रेड अलर्ट” दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या ४८ तासांपासून विदर्भात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात देखील काल पेंढरी व आजूबाजूच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तर आजदेखील सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातदेखील काल सायंकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर आजही पहाटेपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. विदर्भातच नाही तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply