Palghar : कासा बाजारपेठेत भिषण आग ,चार दुकाने आगीत भस्मसात; कोणतीही मनुष्यहानी नाही

Palghar - डहाणू तालुक्यातील डहाणू नाशिक राज्य मार्गावरील कासा बाजारपेठेतील चार दुकानांना भिषण आग लागून चारी दुकाने आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.

कासा पोलीस ठाण्या समोरील बाजारपेठेतील चार दुकानांना शुक्रवारी पहाटे चार च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने दुकाने जळून खाक झाली .पहाटेच्या वेळी प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांनी ही माहिती दिली. या दुकानांमध्ये एक फोटो स्टुडिओ ,कटलरी ,चप्पल दुकान आणि एक इलेक्ट्रिक सामानाचे दुकान जळून खाक झाले.

तर आजू बाजूच्या आणखी दोन दुकानांना याची झळ बसली. आग लागल्याने आजू बाजूच्या दुकानात आग पोहचेल म्हणुन अनेकानी आपले सामान बाहेर काढले. या साठी मोठी धावपळ उडाली होती.

पाचच्या दरम्यान नागरिकांना ही घटना कळल्यानंतर अनेक जण घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण दुकानातील कटलरी व चप्पल या प्लॅस्टिकला आग लागल्याने आग जोरात पसरली . त्वरित डहाणूतील अदानी कंपनीच्या अग्निशमक दलास प्राचारण करण्यात आले.

40 ते 50 मिनिटात अग्निशामक वाहन पोहोचले सुद्धा पण तेवढ्या वेळात हे चारही दुकाने आगीत भस्मसात झाली.अग्निशम दलाने दुकानाच्या मागील बाजूस पत्रे तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या मुळे आजुबाजूस भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतीत कासा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पुढील कारवाई सुरू आहे.

या राज्य मार्गावरच या दुकानांना आगी लागल्यामुळे अग्निशमक दलाची गाडी व पाण्याचा टँकर अशी वाहने रस्त्यातच उभी असल्याने तास दीड तास वाहतूक कोंडी झाली.

या आगीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा अग्निशामक वाहनाची मुंबई अहमदबाद महामार्गावर व आजूबाजूच्या खेड्यात आग विझविण्यासाठी किती मोठी गरज आहे हे कळते .महामार्गावर तर अनेक वाहने आग लागून जळून खाक होतात. म्हणून महामार्ग प्रशासनाने चारोटी टोल नाका येथे आपले एखादे अग्निशामक वाहन ठेवावं अशी मागणी जोर धरत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply