Mumbai News : गुजराती व्यक्तीने बळकवला मराठी महिलेचा गाळा, मनसे पदाधिकारी मदतीला धावले

Mumbai News : मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका मराठी महिलेला सोसायटीत गाळा भाड्याने देण्यास गुजराती भाषिक नागरिकांनी विरोध केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. असं असतानाच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली साईनगर परिसरात एका परप्रांतीय गुजराती माणसाने मराठी महिलेच्या गाळा बळकवल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात महिला तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. रिटा दादरकर असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Mumbai Pune ExPressway : सलग सुट्ट्यांमुळे लगबग! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान वाहतुक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडे साईनगर परिसरात राहणाऱ्या रिटा दादरकर या ज्येष्ठ महिलेचा एक गाळा आहे. तो गाळा परमार नावाच्या व्यक्तीने काही गुंड पाठवून जबरदस्तीने तो बळकवल्याचा आरोप रिटा दादरकर यांनी केला आहे. हा गाळा 1944 पासून रिटा दादरकर यांच्या सासऱ्याच्या नावाने असून 1966 पासून त्याचे असेसमेंट टॅक्स देखील त्यांच्या सासऱ्याच्या नावानेच भरले जात आहेत.

शिवाय त्या ठिकाणी असलेला इलेक्ट्रिसिटी मीटर देखील दादरकर यांच्या मुलाच्या नावाने आहे. मात्र या गाळ्यावर परप्रांतीय गुजराती परमार याने गुंड पाठवून टाळा तोडून जबरदस्तीने गाळ्याचा कब्जा घेतला आहे. 

यासंदर्भात रिटा दादरकर यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र कांदिवली पोलिसांकडून त्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. यामुळे त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. परमारने पोलिसांना देखील सेट केल्याचा आरोप रिटा दादरकर यांनी केला आहे. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही म्हणून रिटा दादरकर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे मदत मागितली असून गुन्हा दाखल करावा यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये ठिया देखील दिला होता.

कांदिवली पोलिसांनी जर परमार विरोधात गुन्हा दाखल केला नाही आणि महिलेला न्याय मिळवून दिला नाही, तर कांदिवली पोलीस ठाण्यावर मनसे भव्य मोर्चा काढणार असल्याचे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनेश साळवी यांनी म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply