Mumbai Heavy Rain : घाटकोपरमध्ये घर कोसळून ४ जखमी; ठाण्यात ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळली

Mumbai : मुंबईमध्ये शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत आता कुठे पावसाला सुरुवात झाली तोवरच भिंत, घर आणि इमारती कोसळल्याच्या घटना घडायला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. तर ठाण्यामध्ये ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घर कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. महादेव खिलारे (५० वर्षे), सुनिता खिलारे (४२ वर्षे), रोहित खिलारे (२३ वर्षे) आणि वैभव खिलारे (२० वर्षे) हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

तर ठाण्यातील चिरागनगर परिसरात एका कॉम्पलेक्सची संरक्षण भिंत चाळीवर कोसळल्याची घटना घडली. 35 फूट लांब आणि 8 फूट उंच असणारी ही संरक्षण भिंत शेजारच्या चाळीवर कोसळली. या घटनेत गणेश बेंडकुळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply