Mumbai : मुंबईत गॅस टंचाईचं संकट, सिलिंडरसाठी रांगा, ब्लॅक मार्केट सुरू; 30 टक्के हॉटेल बंद

Mumbai : गॅस सिलिंडरची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्याने शहर आणि उपनगरांतील सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यापूर्वी कधी सिलिंडर संपला तर शेजारधर्माचे पालन करून तो हक्काने दिला-घेतला जायचा. आता अनेक ठिकाणी त्यात 'ब्लॅक'चे व्यवहार सुरू झाले आहेत.

सिलिंडरच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट पैसे दिले तर सिलिंडरची उपलब्धता करून देऊ असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. ज्या कुटुंबामध्ये पाचपेक्षा अधिक सदस्य आहेत त्यांना सिलिंडरची उपलब्धता मिळताना विलंब होतो तर ज्या कुटुंबामध्ये तुलनेने कमी सदस्य आहेत त्यांना किमान २५ दिवसांनी सिलिंडर मिळण्याची खात्री वाटते. इतरांना ती शाश्वतीही नाही. त्यामुळे अचानक सिलिंडरची उपलब्धता संपली तर काय करायचे या प्रश्नाने मुंबईसह उपनगरांतील स्थानिक बेहाल झाले आहेत.

वाशीनाका येथे राहणाऱ्या स्मिता पवार यांच्या घरात सात सदस्य आहेत. त्यांना एक सिलिंडर किमान २५ दिवस जातो. किंमती वाढल्यापासून त्या सिलिंडर संपण्यापूर्वी एखादा आठवडा बुकिंग करतात. मात्र यावेळी त्यांनी २० दिवस आधीच बुकिंग केले असले तरीही सिलिंडर कधी येईल याची खात्री नाही. कॉलसेंटरला फोन केल्यानंतर तिथून कोणताही प्रतिसाद मिळत नाही तसेच बुकिंगही त्वरित होत नाही. फोन लगेच कट होतो, असे त्या सांगतात. ज्यांचे ऑनलाइन किंवा फोनवर बुकिंग होत नाही त्यांनी रिकामे सिलिंडर घेऊन गॅस सिलेंडरच्या नोंदणी केंद्रांकडे धाव घेतली आहे. तिथे गेल्यानंतर ऑनलाइन नोंदणी केली का, अशी विचारणा होत असल्याने या संभ्रमात भर पडली आहे.

तीस टक्के हॉटेल, उपाहारगृहे बंद

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईचा फटका आता मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसू लागला आहे. शहरातील जवळपास ३० टक्के हॉटेल आणि उपाहारगृहे बंद ठेवावी लागली असून अनेक ठिकाणी मर्यादित वेळ आणि कमी मेन्यूसह सेवा सुरू ठेवली जात आहे. तर छोट्या खाणावळींनी कोळशाचा पर्याय निवडत या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजीच्या सरासरी मासिक गरजेपैकी सुमारे २० टक्के गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे काहीसा दिलासा मिळण्याची आशा असली तरी हा गॅस प्रत्यक्षात बाजारात किती लवकर उपलब्ध होतो, याकडे व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांनी सदस्यांना काही तात्पुरत्या उपाययोजना सुचवल्या आहेत. उपलब्ध गॅसचा काटकसरीने वापर करणे, जास्त गॅस लागणारे पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून कमी करणे, शक्य असल्यास इंडक्शन कुकर किंवा विजेवर चालणारी उपकरणे वापरणे आणि गर्दीच्या वेळांवर लक्ष केंद्रित करून कामकाजाची वेळ ठरवणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घाबरून मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. अशा प्रकारची साठेबाजी केल्यास बाजारातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *