Mumbai Crime News : वाघ कातडी आणि नखांची मुंबईत तस्करी; पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime News: वाघाचे कातडे आणि वाघनखे विकण्यासाठी घेऊन आलेल्या सराईत तीन गुन्हेगारांना बोरिवली एम एच बी कॉलनी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तीनही आरोपींकडून पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरज (30 वर्ष), मोहसीन (35 वर्ष) आणि मंजूर (36 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले वाघाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या कातड्याची लांबी 114 सेंटीमीटर व रुंदी 108 सेंटीमीटर आहे. तसेच 12 वाघ नख्या जप्त करण्यात आल्या आहेत ज्याची अंदाजे किंमत 10 लाख 60 हजार रुपये इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

काही व्यक्ती महाबळेश्वर येथून वाघ वाघ नखे आणि वाघाच्या कातड्यांची तस्करी करण्यासाठी बोरिवली पश्चिमेकडील एलआयसी ग्राउंड येथे येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पो.उ.नि. अखिलेश बोंबे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. बोंबे यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्यामार्फत झोन अकराचे डीसीपी अजय कुमार बंसल यांना कळवले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन शिंदे (गुन्हे), स.पो.नि. भालचंद्र शिंदे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उ.नि. अखिलेश बोंबे, पोलीस हवालदार प्रवीण जोपळे, पोलीस हवालदार संदीप परीट, पोलीस शिपाई प्रशांत हुबळे, पोलीस शिपाई गणेश शेरमाळे यांनी सापळा रचून वाघ नखे आणि वाघाची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या अटकेत असलेल्या सुरज लक्ष्मण कारंडे, मोहसीन नजीर जुंद्रे आणि मंजूर मुस्तफा मानकर एम एच बी कॉलनी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी ही वाघनखे आणि कातडे कुठून आणली आणि कुणाला विकणार होते याबाबत अधिक तपास बोरिवली कॉलनी पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply