Nagpur Hit And Run Case: बावनकुळेंच्या लेकाचा 'कार'नामा, राऊतांचा फडणवीसांना टोला, म्हणाले - ते गृहमंत्रीपदास लायक नाहीत

Mumbai  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेने नागपुरात आपल्या आलीशान ऑडी कारने एका दुचाकीसह चार ते पाच वाहनांना उडवलं. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गाडी चालवताना तो नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा कडून केला जात आहे. तर आज संजय राऊतांनी याप्रकणी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?


"गाडीवरील नेमप्लेट का काढली, जर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबाचा या अपघाताशी काही संबंध नसेल तर ही चोरीचपाटी का केली. जो शेहजादा गाडी चालवत होता तो तर नशेत होता. त्याला वाचवण्यात आलं आहे. हे सारं प्रकरण समोर आल्यानंतर, कायदा किती भ्रष्ट झालेला आहे, खासकरुन जिथून फडणवीस येतात त्या शहराची ही स्थिती आहे".

"जर दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता तर आतापर्यंत फडणवीसांच्या फौजेने आमच्यावर हल्ला चढवला असता. पण, आज तो तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे, नशेत होता, गाडी चालवत होता, या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत, मृत्यूशी झुंज देत आहेत आणि एफआयआरमध्ये नाव देखील नाही", असा आरोप राऊतांनी केला.

"जर गाडी बावनकुळेंच्या मुलाची आहे, त्यांची आहे, मुलगा गाडी चालवत होता. सर्व पुरावे नष्ट केले, तर तुम्हाला कायद्याच्या नावाखाली विरोधकांचा छळ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? नाही आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाही", असं म्हणत त्यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

"जोपर्यंत या राज्याचे गृहमंत्री फडणवीस आहेत, तोपर्यंत या राज्यात कुठल्याही गुन्ह्याचा प्रामाणिक तपास होणार नाही. जोपर्यंत रश्मी शुक्ला डीजी आहेत, तोपर्यंत प्रामाणिक तपास होणार नाही. कायद्याला खरेदी केलं जात आहे. लोक त्यांच्या गाडीखाली चिरडली जात आहेत आणि तक्रारीत नावही नाही".

"लाहोरी बारमध्ये कोणी नशा करत होतं, कोण गाडीत बसलं, कोण गाडी चालवत होतं, याचं सीसीटीव्ही फुटेज होते, जे आता नाहीये", असाही आरोप राऊतांनी केला आहे.

"हा प्रश्न बावनकुळेंचा नाही, तर कायद्याचा जो कचरा होत आहे त्याचा आहे. कायदा सर्वांना सारखा हवा, असं मोदी म्हणतात, ते या राज्यात होत नाहीये. आमच्यावर गुन्हे दाखल करणार, तुम्ही लोकांना चिरडून मोकाट सुटणार हा कुठला न्याय आहे. फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्रीपदाला लायक नाही", असं म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply