Mumbai Crime : एकटी असल्याचे पाहून घरात घुसला, हात-पाय बांधून हत्या; वृद्ध महिलेच्या हत्येने मुंबई हादरली

 

Mumbai : मुंबईच्या वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. वांद्र्यातील रिक्लेमेशन परिसरात ही घटना घडली. घरामध्ये एकटी असल्याचे पाहून चोरीच्या उद्देशाने चोर घरामध्ये घुसला. चोराने वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून तिची हत्या केली. हत्येनंतर चोराने मुद्देमाल घेतला आणि घराचे दार लावून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी वांद्र्यामध्ये एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. रिक्लेमेशन परिसरातील एका इमारतीमध्ये रेखा खोंडे ही वृद्ध महिला राहत होती. घरामध्ये एकटी असल्याचे पाहून चोरीच्या उद्देशाने चोराने त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. या चोराने रेखा यांचे हात-पाय बांधले आणि त्यांची गळा चिरून हत्या केली. वृद्ध महिलेची हत्या झाल्याने वांद्रे परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. शहरीफ अली समशेर शेख (२७ वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३ दिवसांपूर्वी चोरीच्या उद्देशाने महिलेच्या घरात घुसून शहरीफने तिची हत्या केली होती. ३ दिवस झाले तरी या महिलेचा मृतदेह घरामध्येच पडून होता. शेजारी राहणाऱ्या कोणालाच याबद्दल काहीच माहिती नव्हती.

महिलेची हत्या आणि चोरी करून आरोपीने घराचे दार बंद केले होते. आज बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याजवळील मुद्देमाल हस्तगत केला. वांद्रे पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. त्याने याआधी देखील असे गुन्हे केले आहेत की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply