Manoj Jarange Patil Jalna Sabha : मनोज जरांगे पाटलांची आज जंगी सभा; राज्यभरातील मराठ्यांची जालन्याकडे कूच, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Manoj Jarange Patil Jalna Sabha : मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात दंड थोपाटणार आहे. जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात जंगी सभा होणार आहे.

या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी जालन्याच्या दिशेने कूच केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे ४० दिवसांचा वेळ मागवून घेतला होता. या काळात आपण आरक्षणचा मुद्दा मार्गी लावू असं आश्वासन देखील राज्य सरकारने दिलं होतं. 

राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. येत्या ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास पुन्हा एकदा आपण बेमुदत उपोषण सुरू करणार, असा इशाराही त्यांनी दिला होता.

आता जरांगे यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अवधी आज संपला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आजच्या सभेत काय बोलणार? आरक्षणाबाबत मराठा समाजाची काय भूमिका मांडणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

सभेसाठी १६० एकरावर मंडप

आंतरवाली सराटी गावात होणाऱ्या या सभेसाठी १६० एकरावर मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाला ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ असे नाव देण्यात आले आहे. सभामंडपातील शेवटच्या मराठा बांधवाला व्यवस्थित भाषण ऐकू यावे, तसेच दिसावं यासाठी मोठमोठ्या स्क्रीनची सोय करण्यात आली आहे.

सभामंडपात प्रवेश करण्यासाठी एकूण ७ प्रवेशद्वार असून महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. सभेच्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सोय तसेच फिरते दवाखाने, रुग्णवाहिकाही उपलब्ध असणार आहेत. सभेसाठी येणार्‍या मराठाबांधवांच्या तसेच इतर नियोजनासाठी ५ हजार स्वयंसेवक जातीने तैनात असणार आहेत.

सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची ही सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. राखीव दलाबरोबरच हजारभर पुरुष तसेच महिला पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक असा फौजफाटाही तैनात असणार आहे. संपूर्ण बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस अधीक्षकांकडे असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply