Maharashtra Weather : राज्यासाठी पुढचे २४ तास धोक्याचे; मुंबईसह या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहे. कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहे. अवकाळीसह सातत्याने गारपीटीने बळीराजा हतबल झाला आहे. 

हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान, अवकाळीचं हे संकट कधी पाठ सोडणार? असा प्रश्न अनेकांना पडला असताना हवामान खात्याने येत्या २४ तासांत राज्यातील काही भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, सोमवारी देखील राज्यात हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळीने धुमाकूळ घातला.

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. विदर्भात वादळी वाऱ्यामुळे सोमवारी रात्री काही जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर मराठवाड्यात सुद्धा काही भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे पुणे पिंपरी-चिंचवड परिसराला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढलं.

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाल्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील शिवाजीगर, बाणेर, डेक्कन, भुगाव, सांगवी, औंध आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

खरंतर, महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे.

तर पुढच्या २४ तासामध्ये मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply