Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मुंबई, पुण्यासह अनेक भागात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : गेल्या आठवडाभरापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचं दिसून येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान, राज्यात आजपासून पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके मातीत गेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले. सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राज्यात आजपासून पावसाची शक्यता

राज्यात आजपासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे, नाशिक, नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या  पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासह विदर्भावर अधिक परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह देखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

मराठवाड्यात पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर येथे, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply