Ahmednagar : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे यांचे पुनवर्सन होणार; मुख्यमंत्र्यांनी दिल्या मदतीच्या सूचना

Lavani Samradni Shantabai Londhe : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची व्यथा जगासमोर आल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील शांताबाईची दखल घेतली असून त्यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात जाऊन शांताबाईची विचारपूस केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे देखील उपस्थित होते. शासनाच्या वतीने शांताबाईचा योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

एकेकाळच्या लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर या बसस्थानकावर भीक मागून जीवन जगत असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर शांताबाईसाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.

शांताबाईची कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर आणि पालकमंत्र्यांनी शांताबाई कोपरगावकर यांची दखल घेतली असून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

त्यानुसार कोपरगाव तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर केला असून त्यांना एक हजार रूपये दरमहा मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर दुबार रेशनकार्ड ऑनलाईन करून शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ तसेच केंद्र पुरुस्कृत कलाकार मानधन योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शांताबाई यांना वैद्यकीय उपचारांसह सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply