Kolhapur : प्राध्यापिकेकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण ‌करणारं वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur : कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेने हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

प्राध्यापक महिलेच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी  संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधित प्राध्यापक महिलेने जाहीर माफीनामा द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या वक्तव्यानंतर कोल्हापूरातील शहरातील निवृत्ती चौकात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी जमल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात लेक्चर सुरू असताना महिला प्राध्यापिकेने औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वाऱ्यासारखा व्हायरल झाला.शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयात जाऊन त्या प्राध्यापक महिलेवर निलंबनाची कारवाई करावी आणि त्या महिलेने समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा या महिलेच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कोल्हापूरातील निवृत्ती चौकात एकत्र आले. या पार्श्वभूमीवर निवृत्ती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित महिलेला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत या महिलेच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना ताब्यात घेतलं. दरम्यान या सर्व प्रकाराने निवृत्ती चौक परिसरासह शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

दरम्यान, कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याचसोबत त्यांनी कोल्हापूरात मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. या तणावानंतर कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply