Karnataka Border Dispute : कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करावा; शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांची मागणी

Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच उफाळला आहे. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधानसभेनं नुकताच संमत केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलंय. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवलेला आहे.

शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आपल्या अनेक कार्यकर्त्यांना घेऊन ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. जो पर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर निर्णय होत नाही तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित ठेवावा अशी मागणी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे.

खासदार संजय मंडलिक हे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते, धरणे आंदोलनाला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवलेला आहे. यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, उद्या नागपूर अधिवेशनात महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या वतीने ठराव मांडणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सीमावासियांच्या लढ्यासोबत आहेत. सोबतच केंद्र सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून उद्धव ठाकरेंनीही शिंदे-फडणवीस सरकारचे कानही टोचले. उद्धव ठाकरेंनी आज सभागृहात आल्यानंतर आपण सोबत पेनड्राईव्ह आणल्याचं सांगितलं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्नावर इथे महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना, एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जाण्याची काय गरज होती. बरं ते दिल्लीत गेले, तिथे ते सीमावादावर चर्चा करणार आहेत का? यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह आणल्याची देखील माहिती दिली.

दरम्यान, सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच सुनावलं. नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे आजच्या आज ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. निदान इथे ग्रामपंचयत तरी बरखास्त करणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply