Karad : पाथरपुंज ठरतेय महाराष्ट्राची चेरापुंजी; यंदाच्या हंगामात उच्चांकी पाऊस, सहा हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला

Karad : पाटण तालुक्यातील पाथरपुंजने यंदाही सर्वाधिक पावसाचा विक्रम साधला असून, यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर सहा हजार मिलीमीटर पावसाचा टप्पा ओलांडला आहे. पाथरपुंजला ६,०२४ मिलीमीटर (२३७.१६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील हा उच्चांकी पाऊस असून, बहुदा तो देशातही अग्रेसर असावा.

सह्याद्रीच्या डोंगररांगांसह पश्चिम महाराष्ट्रात आजवर मान्सूनच्या पावसाचे सरासरीच्या एकतृतीयांशहून अधिकचे प्रमाण राहिले आहे. त्यात विशेषतः पश्चिम घाटमाथ्यावर सतत जोरदार पाऊस झाला आहे. अलीकडे याच प्रदेशातील पाथरपुंज हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून लौकिकास आले आहे. पाथरपुंज परिसरातील पावसाचे पाणी हे सांगली जिल्ह्यातील वारणा- चांदोली धरणाला मिळते. गेल्या चार- पाच वर्षात पाथरपुंज परिसरातच सर्वाधिक पाऊस होत आहे. सन २०१९ च्या पावसाळ्यात पाथरपुंजने देशात सर्वाधिक पाऊस होणाऱ्या मेघालय राज्यातील चेरापुंजीला मागे टाकले. यावेळी पाथरपुंजला एकूण ९,९५६ मिलीमीटर (३९२ इंच) पावसाची नोंद झाली झाल्याने आपसूकच पाथरपुंज हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून चांगलेच गाजले.

Pimpri : पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव

 

विशेष म्हणजे यानंतर सलग पाचही वर्षे महाराष्ट्रात पाथरपुंज या ठिकाणीच उच्चांकी पाऊस झाला. सन २०१९ नंतर सलग तीन वर्षे पाथरपुंजला जवळपास सहा ते सात हजार मिलीमीटर पावसाची नोंद राहिली. परंतु, गतखेपेला मान्सूनच्या निराशाजनक कामगिरीत पाथरपुंजचे पाऊसमानही घटले.

पाथरपुंजला गेल्या सन २०२३ च्या संपूर्ण वर्षभरात झालेल्या ५,७२६ मिलीमीटर (२४३.४४ इंच) पावसापेक्षा यंदा आजवर २९८ मिलीमीटर (११.७४ इंच) ज्यादाचा पाऊस झाला आहे. अजूनही पावसाळ्याचा बराच कालावधी शिल्लक असल्याने पाथरपुंजचा पाऊस या खेपेस सन २०१९ चा आपला ९,९५६ मिलीमीटर (३९२ इंच) कोसळण्याचा विक्रम मागे टाकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अवर्षणप्रवण प्रदेशातही आजवर तुलनेत चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी जनतेच्या हा हंगाम सुगीचा जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

सर्वाधिक पावसाची ठिकाणे

यंदा आजवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे असलेल्या वाळवण येथे ५,५३२ मिलीमीटर (२१७.७९ इंच), दाजीपुर येथे मिलीमीटर ५,२८६ (२१७.७९ इंच), नवजा येथे ५,१९७ मिलीमीटर (२०८.११ इंच), निवळे येथे ४,९८४ मिलीमीटर (१९६.२२ इंच), महाबळेश्वरला ४,९२३ मिलीमीटर (१९३.८१ इंच), जोर येथे ४,८५२ मिलीमीटर (१९१ इंच), गगनबावडा येथे ४,५५४ मिलीमीटर (१७९.२९ इंच) सांडवली येथे ४,५१३ मिलीमीटर (१७७.६७ इंच), कोयनानगर येथे मिलीमीटर ४,३६० (१७१.६५ इंच) पावसाची नोंद आहे. यातील नवजा, कोयनानगर, महाबळेश्वर ही ठिकाणे कोयना धरणक्षेत्रात येतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply