Israeli-Palestinian Conflict : युद्धाचा भडका; ‘हमास’ने हल्ला करताच इस्त्राईलचा गाझावर बॉम्ब वर्षाव

जेरुसलेम : गाझा पट्टीवर हुकूमत गाजविणाऱ्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने आज सकाळीच दक्षिण इस्राईलवर अनेक आघाड्यांवरून हल्ला चढविल्यानंतर मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडाला आहे. ‘हमास’ने इस्राईलवर क्षेपणस्त्रांचा अक्षरशः पाऊस पाडला.

या संघटनेच्या दहशतवाद्यांनीही अतिशय भक्कम मानली जाणारी इस्राईलची सीमाही भेदली आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात ४४ इस्रायली नागरिक ठार झाले असून ५४५ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्राईलने देखील गाझापट्टीवर बाँब वर्षाव केला, यात १९८ पॅलिस्टिनी नागरिक ठार झाले असून १ हजार ६१० जखमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्राईलवरील या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला असून भारतानेही या संकटाच्या काळामध्ये आम्ही इस्राईलच्या पाठीशी उभे आहोत, असे म्हटले आहे. जमीन, हवेतून आणि समुद्रमार्गे ‘हमास’चे दहशतवादी इस्राईलमध्ये घुसले होते.

इस्राईलच्या जमिनीवर पाय ठेवताच या दहशतवाद्यांनी लोकांच्या दिशेने बेछूट गोळीबार करायला सुरूवात केली, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र लोकांची पळापळ आणि जखमींचा आक्रोश पाहायला मिळत होता. तेलअवीवप्रमाणेच अन्य बड्या शहरांमध्ये इशाऱ्याचे सायरन वाजत होते तसेच पोलिस आणि सुरक्षादलेही सज्ज झाली होती.

इस्राईलने देखील या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर देताना गाझा पट्टीवर बाँब वर्षाव करत अक्षरशः आग ओकली. युद्धाला सुरूवात झाली असल्याची घोषणा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली आहे.

या दहशतवाद्यांनी काही इस्राईली नागरिकांना देखील ओलिस ठेवल्याचे समजते. या संघर्षामुळे जगावरच अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून अमेरिका, रशिया आणि अन्य बड्या देशांनी हा संघर्ष लवकर थांबणे गरजेचे असल्याचे मत मांडले. गाझातील संघर्ष तातडीने थांबायला हवा, असे मत रशियाने व्यक्त केले आहे.

इस्राईलला मान्यतेची चर्चा अन्

अमेरिका, सौदी अरेबिया आणि इस्राईल यांच्यात करार होऊन इस्राईलला अधिकृत मान्यता देण्याची तयार चालली होती. यासाठीची सूत्रे देखील अमेरिकेतून हालत होती. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी काही दिवसांपूर्वी इस्राईलसोबतचे संबंध आम्हाला सुधारायचे असल्याचे म्हटले होते.

त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने तणाव वाढला आहे. ‘हमास’चा म्होरक्या मोहंमद दिफ याने एक रेकॉर्ड केलेला संदेश व्हायरल केला असून ऑपरेशन ‘अल अक्सा स्टॉर्म’ सुरू झाल्याची घोषणा केला. आमच्यावर हल्ला करून ‘हमास’ने मोठी चूक केली असल्याचे इस्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

दिवसभरात

  • हिंसक संघर्ष थांबविण्याचे सौदी अरेबियाचे आवाहन

  • ‘हमास’च्या हल्ल्याचा अमेरिकी सरकारकडून निषेध

  • ‘हमास’च्या कमांड सेंटरवर इस्रायली लष्कराचा हल्ला

  • इस्राईलमधील ऊर्जा प्रकल्पावरही बाँबहल्ले

  • इराण सरकारचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

  • युक्रेनकडून इस्राईलच्या प्रत्युत्तराचे समर्थन

  • इस्राईल पॅलेस्टाईनला संघर्ष टाळण्याचे तुर्कीएचे आवाहन

 

भारताकडून सावधगिरीचा इशारा

पॅलेस्टाईन आणि इस्राईलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने त्याभागांत राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून त्यांना सुरक्षितस्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. इस्राईलमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी स्थानिक नियमांचे पालन करावे असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

त्यांना धडा शिकवू : नेतान्याहू

या संघर्षाला तोंड फुटल्यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. देशाच्या लष्कराला एकत्रित होण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ही केवळ मोहीम, अथवा गोळीबार नाही तर युद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. शत्रूला आता अभूतपूर्व किंमत मोजावी लागणार असून आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी नमूद केले.

 

‘अल अक्सा स्टॉर्म’ अन् ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड’

‘हमास’ने त्यांच्या कारवाईला ‘अल अक्सा स्टॉर्म’ असे नाव दिले असून इस्रायली लष्करानेही ‘हमास’च्या विरोधात मोहीम सुरू केली असून त्याला ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड’ असे नाव देण्यात आले आहे.

जेरुसलेममधील ‘अल अक्सा’ ही मशीद इस्राईलने अपवित्र केली होती त्याचा बदला म्हणून आम्ही हा हल्ला करत आहोत असे ‘हमास’चा कमांडर मोहंमद दिफ याने म्हटले आहे. इस्राईलच्या पोलिसांनी यंदा एप्रिल महिन्यामध्ये ‘अल- अक्सा’ मशिदीवर ग्रेनेड हल्ला केला होता. तेव्हापासून ‘हमास’चे दहशतवादी संतापले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply