LSG vs CSK : मन जिंकलं धोनीनं पण सामना जिंकला केएलनं! मात्र लखनौच्या विजयानंतरही पॉईंट टेबल जैसे थे

MS Dhoni Won Heart With Batting But KL Rahuls LSG Defeat CSK IPL 2024 : लखनौचा नवाबी थाट काही औरच असतो! लखनौ सुपर जायंट्सचा सामना सीएसकेसोबत होणार म्हटल्यावर शहरभर पोस्टर लावली... पोस्टरचा विषय काय तर धोनी! लखनौच्या या नवाबी थाट असलेल्या चाहत्यांना धोनीनं षटकारांची आतशबाजी करावी अन् केएल राहुलनं सामना जिंकावा असं देखील वाटत होतं. लखनौचे चाहते दोन्ही दगडांवर हात ठेवून होते. या नवाबी चाहत्यांना ना धोनीनं निराश केलं ना केएल राहुलनं!

लखनौनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् धोनीला सामना जिंकून देण्यापासून रोखलं. कारण धोनीला आता चेस करायला नाही तर टोटल उभारायला यावं लागणार होतं. धोनी आला अन् त्यानं लखनौच्या चाहत्यांच मन देखील जिंकलं! अवघ्या 9 चेंडूत 28 धावा कुटल्या. त्यात एक स्कूप शॉट खेळून नवाबी चाहत्यांना नवाबी नजराणा पेश केला. सीएसकेनं लखनौसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं.

KL Rahul Breaks MS Dhoni Record : केएल राहुलनं धोनीच्या साक्षीने मोडला 'थाला'वाला विक्रम! बनला IPL चा नंबर 1 विकेटकीपर

धोनी फटकेबाजी करत होता त्यावेळी असं वाटलं की आता चेन्नई जिंकणार! मात्र एकाना स्टेडियमवरील पिवळ्या बहुसंख्यकांमध्ये काही लखनौचे डाय हार्ट फॅन देखील होते. त्या फॅनसाठी लखनौचा कर्णधार केएल राहुल सगळ्या यलो आर्मीला भिडला. त्यानं सीएसकेनं दिलेलं टार्गेट कसं छोटं आहे हे दाखवून दिलं.

डिकॉकसोबत केएलनं पॉवर प्लेमध्ये सामन्याचा टोन सेट केला. आऊट ऑफ फॉर्म असलेला डिकॉक सावध खेळत होता. तर केएल राहुल दुसऱ्या बाजूनं सीएसकेच्या गोलंदाजांनी पिसं काढत होता. केएलची बॅटिंग पाहून बहुदा डिकॉक देखील फॉर्ममध्ये आला. त्यानंही नंतर सीएसकेवर हल्ला चढवला.

या दोघांनी जवळपास 10 च्या रन रेटनी धावा करत बघता बघता शतकी सलामी ठोकली. केएल राहुलनं आजच्या सामन्यात आपल्यावरचा स्लो स्ट्राईक रेटवाला शिक्का देखील पुसण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 15 षटकात 134 धावांची सलामी दिली. त्यानंतर डिकॉक बाद झाला. संघाला 150 चा टप्पा ओलांडून दिल्यानंतर केएल राहुलनं देखील मैदान सोडलं. तो शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र 82 धावांवर पथिरानानं त्याला बाद केलं.

केएल बाद झाल्यानंतर निकोलस पूरननं गडबड न करता लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. लखनौ अन् चेन्नईच्या सामन्याचं वर्णन करायचं झालं तर सगळं कसं गुडी गुडी झालं! धोनी 2.0 चा साक्षीदार झाल्यानं थलाचे फॅन खूश अन् लखनौनं सीएसकेला मात देत सामना जिंकल्यानं केएलचा संघही खूश! बाकी सामना जिंकूनही गुणतालिकेत लखनौचे स्थान काही बदलेलं नाही! ते रनरेटमध्ये मागं पडल्यानं 8 गुण घेऊनही पाचव्या स्थानावरच आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply