Shreyas lyer :'मी गोंधळलोय, मला दोन प्लेइंग इलेव्हनच्या शीट दिल्या...', टॉसवेळी KKR कॅप्टनचा सावळा गोंधळ

IPL 2024, RCB vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध 7 विकेटन्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीदरम्यान कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरचा झालेला गोंधळ चर्चेचा विषय ठरला.

झाले असे की सामन्यापूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस नाणेफेकीसाठी आले होते. यावेळी श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्विकारत बेंगळुरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

यानंतर त्याच्या निर्णयाबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली. मात्र त्यानंतर प्लेइंग इलेव्हन सांगताना त्याचा मोठा गोंधळ झाला.

त्याने अनुकूल रॉयला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याचे सांगितले, मात्र त्याला कोणाच्या जागेवर संधी दिली हे सांगायचे तो विसरला. तसेच त्याने सोबत आणलेल्या प्लेइंग इलेव्हनच्या दोन्ही शीटला पाहिले, पण तो गोंधळलेलाच दिसला.

त्यावेळी श्रेयस म्हणाला, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. क्युरेटरबरोबर आमची चर्चा झाली असून तिने सांगितले की फिरकी गोलंदाजीला मदत मिळू शकते. सर्वांमध्ये उत्साह आहे. आम्हाला आमची चांगली लय कायम ठेवायची आहे. तसेच वर्तमानात राहणेही महत्त्वाचे आहे.'

RCB Vs KKR: वेंकटेश अय्यरने ठोकला IPL 2024 मधील सर्वात लांब षटकार, दोनच दिवसात मोडला इशान किशनचा विक्रम

'माझी भूमिका अँकर फलंदाजाची आहे. संघात चांगली गोलंदाजांची फळी असणे नेहमीच चांगले असते. गोलंदाजीबाबत सांगायचे झाले, तर अनुकूल रॉयला संधी दिली आहे. पण मी खरंच गोंधळलो आहे. मला दोन प्लेइंग इलेव्हनच्या शीट दिलेल्या आहेत.'

दरम्यान, नाणेफेकीवेळी जरी श्रेयसला गोंधळ झाला असला, तरी नंतर संघांनी सुपूर्त केलेल्या प्लेइंग इलेव्हनमधून गोंधळ दूर झाला. अनुकूल रॉयला नितीश राणाच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली. तसेच अंगक्रिश रघुवंशीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. बेंगळुरूकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 83 धावांची नाबाद खेळी केली. कोलकाताकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने 17 व्या षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच सुनील नारायणने 47 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने नाबाद 39 धावा केल्या.

बेंगळुरूकडून यश दयाल मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply