IAF Plane Crash : एकाच दिवसात हवाई दलाची ३ विमानं कोसळली, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील दुर्घटना

IAF Plane Crash: मध्य प्रदेशातील मोरेना येथे हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले. याठिकाणी सराव सुरू होता अशी माहिती आहे. या घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या विमान दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे आणि पायलट सुरक्षित असावेत यासाठी प्रार्थना केली आहे. ते ट्वीट करून म्हणाले की, "मोरेनाच्या कोलारसजवळ वायुदलाचे सुखोई-३० आणि मिराज-२००० विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुखद बातमी आहे. वायुसेनेला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विमानांचे पायलट सुरक्षित असावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो."

मोरेनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले आहेत. या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे हे पाहणार आहे. अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. 2 पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले विमान

दरम्यान राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उछैन परिसरात एक विमान कोसळ्याची घटना घडली आहे. या विमानाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथून उड्डाण घेतले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमान रहिवासी भागात कोसळले नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply