GT vs PBKS IPL 2024 : पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार? अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सशी लढणार

GT vs PBKS IPL 2024 : लखनौचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या भेदक गोलंदाजीपुढे नतमस्तक ठरलेला पंजाब किंग्सचा संघ आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सशी दोन हात करणार आहे. याप्रसंगी सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी पंजाबचा संघ प्रयत्न करताना दिसेल. गुजरातचा संघ मात्र सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला असेल.

कर्णधार शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन या फलंदाजांचा उद्या कस लागू शकतो. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडू हळूवारपणे बॅटवर येतो. चेंडू वेगाने बॅटवर आल्यास धवन, बेअरस्टो लिव्हिंगस्टोन हे फलंदाज सहज खेळू शकतात. त्यामुळे मोहित शर्मा, राशीद खान, नूर अहमद या गुजरातच्या गोलंदाजांचा पंजाबच्या फलंदाजांना समर्थपणे सामना करावा लागणार आहे. जितेश शर्मा व प्रभसिमरन सिंग या भारतीय फलंदाजांनाही आपले कसब दाखवावे लागणार आहे.

IPL 2024 : ऋषभ पंतवर लागणार एक सामन्याची बंदी... 'या' चुकीमुळे BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

गोलंदाजी विभागाची चिंता

पंजाबच्या संघाला यंदाच्या मोसमात गोलंदाजी विभागाची चिंता सतावत आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ११.४१ च्या सरासरीने धावांची लूट करण्यात आली आहे. राहुल चहरच्या गोलंदाजीवरही ११.३७ च्या सरासरीने धावा वसूल करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी अर्शदीप सिंग अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी कामगिरी करीत होता, पण यंदा त्याच्याकडूनही घातक गोलंदाजी झालेली नाही. हरप्रीत ब्रारने समाधानकारक कामगिरी केलेली आहे.

साई, गिल, मिलरवर मदार

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरातने मागील दोन्ही आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. यंदा हा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरत आहे. गिलसह साई सुदर्शन, डेव्हिड मिलर याच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. रिद्धिमान साहाला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

घरच्या मैदानावर विजय

गुजरात संघाने यंदाच्या मोसमात आतापर्यंत तीन लढती खेळल्या आहेत. यापैकी दोन लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला असून एका लढतीत शुभमन गिलच्या सेनेला हार पत्करावी लागली आहे. विशेष म्हणजे गुजरातने अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर झालेल्या दोन्ही लढतींमध्ये विजय संपादन केला असून चेन्नई येथे झालेल्या लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. आता गुजरातचा संघ उद्या पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पंजाबचा सामना करणार आहे.

प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानांवर पराभव

पंजाबच्या संघाने सलामीच्या लढतीत दिल्लीला नमवून दमदार सुरुवात केली. पंजाबने मुल्लानपूर येथील घरच्या मैदानावर हा विजय साकारला. त्यानंतर मात्र पंजाबच्या संघाला बंगळूर व लखनौ येथील प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानांवर पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबला आता पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळावयाचे आहे. पंजाब-गुजरात ही लढत अहमदाबादमध्ये होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply