Ganpat Gaikwad : 'त्याच' प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर दाखल होता गुन्हा; पोलिसांनी पाळली गुप्तता

Ganpat Gaikwad : द्वारली गावातील जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात हिल लाईन पोलीस ठाण्यातच रक्तरंजित थरार घडला. द्वारली गावातील शेतकऱ्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र याच जमिनीच्या वादातून कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या विरोधात देखील हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिक (वय 37) यांच्या तक्रारीवरुन महेश यांच्यासह राहूल पाटील, अक्षय गायकवाड, किरण फुलोरे, सुनिल जाधव आणि एकनाथ जाधव व 60 ते 70 जण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतू या दाखल गुन्ह्याचे प्रकरण उघड झाले आहे.

Nagpur News : नागपूर जिल्ह्यासाठी आऊटर रिंग रोड ‘लाईफलाईन’ ठरेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद समोर आला आहे. यापूर्वी देखील कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. परंतु द्वारली गावातील जमिनीच्या वादातून दोन्ही गायकवाडांमध्ये उडालेले खटके टोकाला गेले असून यातूनच आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळी झाडली.

याच वादातून नीता शिंदे यांच्या तक्रारीवरुन आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 7 जणांवर हिललाईन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याच प्रकरणावरुन आता महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे 5 साथीदार व 60 ते 70 जणांविरोधात विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारीक यांच्या तक्रारीवरुन 2 तारखेला हिललाईन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार वरटॅक्स स्काय व्हिला बांधकाम कंपनीचे संचालक पारीक तसेच मे. फेअरडील डेव्हलपर्स भागीदार संस्थेचे प्रमोद रंका यांचे द्वारली येथे भागीदारी पध्दतीने जमीन विकसित, गृहप्रकल्प विकसित करण्याचे काम प्रस्तावित आहे. खरेदी-विक्री व्यवहाराने ही जमीन भागीदारांनी कब्जात घेतली आहे.

31 जानेवारीला दुपारी 1.30 वाजता तसेच 2 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता या जागेत महेश गायकवाड, राहूल पाटील, एकनाथ जाधव, किरण फुलोरे, सुनिल जाधव, अक्षय गायकवाड यांसह 60 ते 70 स्थानिक नागरिक तक्रारदारांच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदा घुसले. तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना न जुमानता त्या जमावाने जागेत जबरदस्ती घुसून जागेवर आमचा कब्जा असल्याचे सांगून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेथील कामगारांना दमदाटी, शिवीगाळ करुन तेथील काम बंद पाडले. बांधकामाच्या ठिकाणचे लोखंडी खांब व संरक्षित भिंत म्हणून लावलेले पत्रे उखडून फेकून दिले. बेकायदा जमाव जमवून तक्रारदार जितेंद्र पारीख यांच्या जागेत घुसखोरी केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

कल्याण शहर प्रमुख महेश यांच्याविरोधात देखील या जमिनीच्या वादातून गुन्हा दाखल असल्याबाबत कमालीची गुप्तता पोलिसांनी बाळगली होती. पत्रकारांनी त्यांना याप्रकरणी विचारणा देखील केली मात्र हिललाईन ऐवजी इतर पोलिस स्थानकांची नावे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. अखेर ही बाब उघडकीस आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply