ENG vs WI : दे दणादण, शेरफेनचं वानखेडेत वादळ, इंग्लंडसमोर 197 धावांचं आव्हान, कोण जिंकणार सलग दुसरा सामना?

शेरफेन रुदरफोर्ड याने अखेरपर्यंत नाबाद राहत केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर 197 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना आहे. तसेच दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली आहे. आता विंडीजने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 196 धावा केल्या आहेत. अशात आता दोघांपैकी कोणता संघ सलग दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या डावात काय झालं?

हॅरी ब्रूक याने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. हॅरीचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरतोय असं वाटत होतं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये सलामी जोडीला आऊट करत विंडीजला बॅकफुटवर फेकलं.

जोफ्रा आर्चर याने विंडीजचा कॅप्टन शाई होप याला आऊट करत विंडीजला पहिला झटका दिला. होपला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सॅम करन याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये ब्रँडन किंग याला 1 रनवर बोल्ड करत विंडीजला दुसरा झटका दिला.

विंडीजचं कमबॅक

इंग्लंडने झटपट झटके दिल्याने विंडीजची स्थिती 2 आऊट 8 अशी झाली. मात्र त्यानंतर विंडीजच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी कमाल केली. शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेज, शेरफेन रुदरफोर्ड, रोवमॅन पॉवेल आणि जेसन होल्डर या 5 फलंदाजांनी निर्णायक योगदान दिलं. त्यामुळे विंडीज इंग्लंडसमोर 200 धावांजवळ पोहचण्यात यशस्वी ठरली.

रोस्टन-शिमरॉनने सावरलं

रोस्टन चेज आणि शिमरॉन हेटमायर या जोडीने झटपट 2 झटके लागल्यानंतर विंडीजला सावरलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 रन्सची वेगवान भागीदारी केली. या दोघांनी 28 चेंडूत या धावा जोडल्या. त्यानंतर हेटमायर 23 धावा करुन बाद झाला. इंग्लंडने विंडीजला 22 धावांनंतर आणखी एक झटका दिला. रोस्टन चेज 34 धावा करुन माघारी परतला.

त्यानंतर शेरफेन रुदरफोर्ड याने रोवमॅन पॉवेल आणि जेसन होल्डर या दोघांसह पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या 2 विकेटच्या भागीदारीमुळे विंडीज चांगल्या स्थितीत पोहचली. रोवमॅन आणि शेरफेन या दोघांनी 29 बॉलमध्ये 51 रन्सची पार्टनरशीप केली. तर होल्डर आणि शेरफेन या दोघांनी 32 चेंडूत 61 रन्स जोडल्या. पॉवेलने 14 धावांचं योगदान दिलं. तर होल्डरने 17 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह 33 रन्स केल्या.

तसेच शेरफेन रुदरफोर्ड याने 42 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 76 धावा केल्या. इंग्लंडसाठी जेमी ओव्हरटन आणि आदिल रशीद या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि सॅम करन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *