ED Inquiry : मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ईडीकडून 4 तास चौकशी

मुंबई - कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची सोमवारी चौकशी केली. ईडीने सुमारे चार तास चहल यांची चौकशी केली.कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी इक्बाल सिंह चहल सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. चार तासांच्या चौकशीनंतर इक्बालसिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करु असं इक्बाल सिंह चहल यांनी माध्यमांना सांगितलं.

कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी चहल याना समन्स पाठवण्यात आलं होतं. कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं. शिवाय कंत्राट प्राप्त करुन घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्रे बीएमसीकडे सादर केल्याचा आरोप आहे. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात ईडीने मुंबई महापालिका आयुक्तांना सोमवारी कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार इक्बाल सिंह चहल आज चौकशीसाठी हजर झाले.

माध्यमांशी बोलताना इकबाल सिह चहल म्हणाले " मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हा कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने मोकळ्या मैदानात जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बीएमसीने राज्य शासनाला निवेदन दिलं की, महापालिका करोना प्रबांधनात फार व्यस्त आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयाचं बांधकाम करू शकत नाही. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कोविड सेंटर बिगर सरकारी संस्थांनी बांधले. त्यामुळे हे कोविड सेंटर उभारण्यात बीएमसीला शून्य रुपये खर्च आला. मुंबईत असे एकूण दहा जम्बो कोविड सेंटर बांधण्यात आले. यातील एका जम्बो कोविड सेंटरबाबात मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली. याच विषयी चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं"



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply