Dhangar Reservation : अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल; आरक्षणासाठी सरकारला २६ जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम

Dhangar Reservation : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना आता धनगर आरक्षणाचा विषय देखील तापताना दिसतोय. राज्य सरकारने तात्काळ शिंदे समितीचा अहवाल मागवावा. तसेच २६ जानेवारीपर्यंत शासनाने योग्य तो निर्णय घेऊन आरक्षण द्यावे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा, धनगर बांधवांनी दिलाय.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने शिंदे समिती नेमूक केली होती. मात्र समिती स्थापन होवून एक महिना लोटला असला तरी अद्याप शिंदे समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे तो अहवाल तात्काळ राज्य सरकारने समितीकडून मागवून घ्यावा, यासाठी आज धनगर परिषद विदर्भ प्रदेश व अमरावती जिल्ह्यातील धनगर बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.

Political News : सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर; खुद्द शिंदेंकडूनच गौप्यस्फोट

राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा विषय निकाली काढण्याचे ठरविले होते. मात्र यासंदर्भात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. शिंदे समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती तो झाला का? की अद्याप अभ्यासाला सुरुवातच झाली नाही? की विना अभ्यासाचा निर्णय घेण्यात येणार? किंवा कसे? याबाबत सरकार सोईस्कर मौन राखून गप्प आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी धनगर बांधवांनी उपस्थित केलेत.

२६ जानेवारीपर्यंत शासनाने धनगर परिषद विदर्भ प्रदेशाच्या धनगर समाज प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून आरक्षणाबाबत ठोस कारवाई करावी अन्यथा २६ जानेवारीनंतर विदर्भातील धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी धनगर बांधवांकडून सरकारला देण्यात आलाय.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply