Dagdusheth Ganapati Mahanaivedya : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर 'दगडूशेठ' गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

Dagdusheth Ganapati Mandir Pune : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. या आंब्यांच्या प्रसादाचे वाटप रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये करण्यात येणार आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास करण्यात आली. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती यावेळी शोभून दिसत होत्या. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट शोभून दिसत होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात या आंबा महोत्सव आयोजित करण्यात आले. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

या निमित्ताने प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांचा स्वराभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सुमधुर आवाजाने मंदिर आणि परिसरातील वातावरन अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं. 

अक्षय तृतीयेनिमित्त आंबे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाशीतील एपीएमसी फळबाजारात आंबे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातली पंधरा हजार आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या असून तब्बल चाळीस हजारांपेक्षा जास्त आंब्याच्या पेट्या या कर्नाटक राज्यातून आल्या आहेत.

हापूस आंब्याला पाचशे ते आठशे रुपये प्रति डझन असा दर मिळत असून कर्नाटक आंब्याला तीनशे ते पाचशे रुपये प्रति डझन असा दर मिळत आहे. आंबे खरेदीसाठी वाशीतील एपीएमसी मार्केट प्रसिद्ध असून आजच्या शुभ मुहूर्तावर आंबे खरेदीसाठी आम्ही आलो असल्याची प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply