Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळचा मुंबईतील वातावरणावर परिणाम, समुद्र खवळला; पर्यटकांना दूर राहण्याचं आवाहन

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ  हे आज गुजरातमध्ये धडकणार आहे. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मुंबईतील  वातावरणावर सुद्धा पाहायला मिळतोय. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर समुद्र खवळलेला आहे. किनाऱ्यावर उंच उंच लाटा उसळत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई चौपाट्या काही वेळापुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. चौपाटींवर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून बाहेर जाण्याचा आवाहन केलं जात आहे. शिवाय जीवरक्षकही चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून तैनात आहेत.

किनारीपट्टीलगतचे बहुतेक रस्ते रिकामे

मुंबईच्या किनारी भागांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा थेट तडाखा बसला नसला तरी, समुद्र मात्र खवळलेला आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह आणि इतर किनारी भागात काही दिवसापासून मोठ्या लाटा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अतितीव्र वेगानं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचे परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जाणवत आहेत. मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया हा किनारी भाग दररोज पर्यटक आणि मॉर्निंग वॉकर्सने भरलेला असतो. मात्र, मोठ्या प्रमाणात लाटा असल्यानं किनारीपट्टीलगतचे बहुतेक रस्ते रिकामे असल्याचे पाहायला मिळत आहे. लाटांच्या भीतीनं ते रस्ते मोकळे होते. मात्र, पोलीस सुद्धा गेल्या काही दिवसापासून पर्यटकांना किनारी भागापासून लांब राहण्याचे आवाहन करत आहेत. 

बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार

अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone biparjoy) गुजरातच्या (Gujarat) दिशेनं सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. हे वादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं योग्य ती खबरदारी घेतली आहे. किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत 74000 नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून NDRFची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत. 

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम तेथील हवामानावर होत आहे. बुधवारी (14 जून) गुजरातमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. 

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ हे गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र प्रदेश, मांडवी किनारा आणि दक्षिण पाकिस्तानमधील कराचीच्या लगतच्या प्रदेशातून जाईल. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी पर्यंत जाऊ शकतो. प्रक्रियेत ते थोडे कमकुवत होत आहे. यामुळं गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply