Covid-19 In India : देशात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; गेल्या 24 तासांत 3,824 नव्या रुग्णांची नोंद

Covid-19 In India: देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या (India Corona Update) आकड्यात पुन्हा वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, शनिवारी देशात  2995 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर शुक्रवारी 3,095 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 18,389 आहे. एकूण आकडेवारीच्या 0.04 टक्के आहे. कोरोनाच्या उद्रेकापासून आतापर्यंत देशात 4,47,22,605 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 4,41,73,335 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशातीच पॉझिटिव्हिटी रेट 98.77 टक्के आहे. तर दुर्दैवी बाब म्हणजे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5,30,881 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 

2.2 अब्जाहून अधिक लसीकरण

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत दोन वर्षांत 2.2 अब्जाहून अधिक कोविड लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसीचे 2,799 डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात 669 नवे रुग्ण

शनिवारी (1 एप्रिल) महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या 669 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 81,44,780 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1,48,441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राज्यात 425 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी 694 रुग्णांची नोंद झाली.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.

घाबरू नका, खबरदारी बाळगा

कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.

दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या सूचना 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे धाकधूक वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा अशी सूचना महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सकडून ही सूचना करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply