Colonel Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Colonel Vaibhav Kale : कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर पुणे कँटोन्मेंट मुक्तिधाम स्मशानभूमीत (धोबीघाट) शासकीय इतमामात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून काळे यांना मानवंदना दिली.

या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कर्नल वैभव काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. भारतीय सैन्याच्या वतीने दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आर. एस. सुंदरम यांनी पुष्पचक्र अर्पण केले. काळे यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या प्रसंगी वैभव काळे यांची आई रचना काळे, पत्नी अमृता काळे, भाऊ विंग कमांडर अक्षय काळे आणि सासरे कर्नल विवेक खैरे (निवृत्त) उपस्थित होते.

Pune Rain News : विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

माजी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल नोबेल थंबुराज (निवृत्त), सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (निवृत्त), उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (निवृत्त), उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (निवृत्त), लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

पठाणकोट हल्ल्यावेळी तुकडीचे नेतृत्व

सियाचीन ग्लेशियर, कारगीलजवळील द्रास, संयुक्त राष्ट्र शांतिसेनेत काँगो, ईशान्य भारतातील सेवांसह पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्यावेळी तुकडीचे नेतृत्त्व केलेले कर्नल (निवृत्त) वैभव अनिल काळे (वय ४६) यांना संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक म्हणून गाझामध्ये सेवा बजावत असताना सोमवारी (ता. १३) वीरमरण आले. कर्नल काळे २००० मध्ये ‘एनडीए’ आणि त्यानंतर ‘आयएमए’मार्फत लष्कराच्या पायदळात रुजू झाले. २०२२ मध्ये त्यांनी लष्करातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत ‘यूएनडीएसएस’मध्ये सेवा सुरू केली. त्यांचे पहिलेच पोस्टिंग गाझा पट्टीत राफा येथे होते. ‘हमास’ विरुद्धच्या युद्धात इस्रायलकडून राफावर भीषण बॉम्बवर्षाव व गोळीबार सुरू होता. तिथेच गेल्या महिन्यात १२ एप्रिलला वैभव काळे यूएन निरीक्षक म्हणून रुजू झाले होते.

यारों का यार’ गमावल्याचे दुःख

मार्केट यार्ड : हसतमुख चेहरा, मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वांशी आदराने वागणारे, कडक शिस्तीचे पण अत्यंत साधे अधिकारी म्हणून कर्नल वैभव काळे यांची ओळख होती. ते मित्रांमध्ये कायम रमायचे. त्यामुळे ‘यारों का यार’ गमावल्याचे दुःख त्यांच्या नातलगांनी व्यक्त केले.

वैभव यांचे चुलत भाऊ हर्षद म्हणाले, ‘‘आम्ही एकूण दहा चुलत भाऊ लहानाचे मोठे झालो. आमचे शालेय शिक्षण बरोबरच झाले. एकमेकांच्या सोबत असूनही आम्हा सर्वांमध्ये वैभवचे ध्येय वेगळे होते. त्याला देशासाठी खूप काही करायचे होते. फेब्रुवारीत झालेली आमची भेट शेवटची ठरली. त्यावेळीही तो नेहमीसारखा मनमोकळेपणाने वागला. त्याच्या कामगिरीचे कौतुक करीत काळजी घे म्हणून त्याला सांगितले होते. लष्करी दलांच्या सोबत असल्याने कोणताही धोका नसल्याचे तो म्हणाला होता. आता असे अचानक झाल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला आहे. तो इतक्यात आमच्यातून जाईल असा विचारही केला नव्हता.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply