BR Ambedkar Jayanti 2024 : फटाक्यांच्या आतिषबाजीने भीम जयंतीचा जल्लोष; देशभरात उत्साहाचं वातावरण

BR Ambedkar Jayanti 2024 : राज्यासह देशभरात आज भारतीय घटनेचे शिल्पकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी अन् ढोलताशांचा आवाज घुमू लागला आहे. अनेक ठिकाणी रांगोळी, तसेच विविध कलेच्या माध्यमांतून महामानवाला अभिवादन केलं जात आहे.

दोऱ्याच्या साहाय्याने साकारली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा

सोलापुरातडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त एका कलाकाराने वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे.विपुल मिरजकर या तरुणाने दोऱ्याच्या साहाय्याने 4 फुटांची बाबासाहेबांची प्रतिमा साकारली आहे. यासाठी 3 हजार मीटर दोऱ्याचा वापर करण्यात आला असून ही प्रतिमा सकरण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागलेला आहे.

Salman Khan : मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; दोन आरोपी फरार, परिसरात खळबळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरावर उभारला बाबासाहेबांचा पुतळा

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका अनुयायाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.अजय भालेराव या अवलियाने चक्क स्वतःच्या घरावरच बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना केली आहे.सोलापुरातील भाग्योदय हौसिंग सोसायटीत 'सरोज' या नव्या बंगल्यावर त्यांनी हा पुतळा स्थापन केला आहे.

7 फूट उंच असणारा हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे.सोलापुरात घरावरील पुतळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना पाहायला मिळत आहे.

 

चांदवडी पेढ्यावर साकारले बाबासाहेबांची रांगोळी

नाशिकच्या चांदवड तालूक्यात चांदवडी पेढा खूप प्रसिध्द असून याच पेढ्यावर कला शिक्षक देव हिरे यांनी आपली कलाकृती साकारली आहे.या चांदवडी पेढ्यावर देव हिरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून त्यांची प्रतिकृती साकारत आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.

पेंन्सिलच्या टोकावर साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती

धाराशिवमधील प्रफुल आणि प्रकाश पांचाळ या बंधूंनी पेंन्सिलच्या टोकावर बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली आहे.पेन्सिलच्या टोकावर साकारलेल्या या प्रतिकृतीत अत्यंत सूक्ष्म कोरीवकाम करण्यात आले असून ती साकारण्यासाठी या बांधवांना पाच तासांचा कालावधी लागला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येत असताना पांचाळ बांधवानी साकारलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रतिकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन केलं जातंय. मूळचे परभणी जिल्ह्यातील आणि सध्या अहमदनगर येथे कार्यरत असलेले कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी काड्या आणि कार्डबोर्डचा वापर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची थ्रीडी कलाकृती साकारत त्यांना अनोखं अभिवादन केलंय.

ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना जवळपास पाच तास लागल्याचे प्रमोद उबाळे सांगतात. कला शिक्षक असलेले प्रमोद उबाळे हे नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून महापुरुषांना अभिवादन करत असतात. त्यांनी बनवलेल्या कलाकृतीचे कौतुक होत आहे.

धाराशिवमद्ये रांगोळीच्या माध्यमातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा

धाराशिव येथे कलायोगी आर्ट्सच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती कार्याला उजाळा देणारी 40 चौरस फूट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात आलीय. रांगोळीमध्ये बाबासाहेबांची सुंदर अशी सुबक हुबेहूब प्रतिमा साकारून एका बाजूला लहान मुलगी आनंदाने शाळेला जात आहे आणि हजारो वर्षांच्या गुलामीचे साखळ दंड तोडून तरुण आनंद साजरा करत बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत, असे चित्रण करण्यात आले आहे. या रांगोळीसाठी 30 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला असून ती साकारण्यासाठी 8 तासाचा कालावधी लागलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply