BMC Covid Scam : २०० हून अधिक डॉक्टरांच्या बोगस नोंदी, कोट्यवधी उकळले; कोविड सेंटर घोटाळ्याची व्याप्ती वाढली

BMC Covid Scam Update : मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. २०० हून अधिक डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यात असल्याचे झाडाझडतीत समोर आले आहे. या कथित घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.  

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचे उघड झाले आहे. कंत्राटी डॉक्टरांच्या नावांच्या बोगस नोंदी केल्या असून, त्यांच्या नावे कोट्यवधी रुपये लाटले आहेत.

बहुतांश डॉक्टरांनी काही दिवस, तर काहींनी काही आठवडे या कोविड सेंटरमध्ये सेवा दिली होती. मात्र त्यांनी कित्येक महिने सेवा दिल्याच्या खोट्या नोंदी करून त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळल्याची माहितीही समोर आली आहे. ईडीने  ई-मेलद्वारे संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असून, या प्रकरणात डॉक्टरांना ईडी साक्षीदार करणार असल्याचेही कळते.

लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना ED चे समन्स

मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना समन्स बजावले आहे. २६ ते २८ जून या काळात ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांना हे समन्स बजावले आहे. तसेच या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहे.

संजीव जयस्वाल यांनी मागितला ४ दिवसांचा वेळ

मुंबईतील कथित कोविड केअर सेंटर घोटाळा प्रकरणात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचे नाव देखील आले आहे. जयस्वाल यांच्या घरावरही छापेमारी केली होती. आता जयस्वाल यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीने काल, गुरुवारी जयस्वाल यांना समन्स बजावले होते.

जयस्वाल हे काल ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हजर राहण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे. ईडी लवकरच त्यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply