Barsu Refinery Protests : गनिमी काव्याने बारसूच्या माळरानावर पाेहचले शेकडाे ग्रामस्थ; जशास तसे उत्तर देण्याची आंदाेलकांची तयारी

Barsu Refinery  : बारसू परिसरातील ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची गुरुवारी राजापूरात बैठक झाल्यानंतर प्रकल्पाला विराेधक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. हा प्रकल्प नकाेच हे सांगण्यासाठी आज (शुक्रवार) पून्हा बारसूच्या माळरानावर प्रकल्प विराेधी गट एकत्र जमणार आहे. दरम्यान आमच्या आंदाेलनात काेण आडवं आले तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आंदाेलक महिलांनी दिला आहे. 

बारसू रिफायनरीसाठी सर्वेक्षणाचा आजचा चौथा दिवस आहे. बोरच्या माध्यमातून बारसू सड्यावर माती परीक्षण केले जात आहे. पोलिसांचा बेस कॅम्प सर्वेक्षणाच्या ठिकाणी बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बोरिंगचे काम दिवस-रात्र सुरू आहे. हा सर्वे लवकर व्हावा यासाठी प्रशासनाच्यावतीने हालचाली करण्यात येत आहेत.

राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला पंचक्रोशीतील अनेक गावांनी विरोध दर्शवलेला आहे. मात्र तरीही प्रशासनाने प्रकल्पासाठी सर्वे सुरू केल्याने या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने गुरुवारी प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या निवडक प्रतिनिधींची बैठक घेतली.

या बैठकीबाबत खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. राऊत म्हणाले आम्ही याबाबत आक्षेप घेतला हाेता. जाेपर्यंत जाणकर कार्यकर्त्यांचे याबाबतचे मुद्दे समजून घेत नाहीत ताेपर्यंत बैठकीला अर्थ नाही. अनेकांना तडीपार केले गेले. त्यामुळे बैठक म्हणजे केवळ फार्स असल्याचे विनायक राऊत यांनी नमूद केले.

आज खासदार विनायक राऊत हे आंदाेलकांची भेट घेण्यासाठी राजापूरात आले. राजापूर सर्किट हाऊसच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांची अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत चर्चा केली. पाेलिसांनी मोर्चाला न जाण्याचं आवाहन खासदार राऊत यांना केले आहे.

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आज बारसूच्या माळरानावर धडकणार आहेत. या संपूर्ण परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी पोलीस चौकी उभ्या करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. प्रसार माध्यमांना रोखण्यासाठी देखील पोलीसांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

आंदाेलकांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रणनितीनूसार (गनिमी कावा) माळरानावर पाेहचू. आम्हांला काेणी आडवलं तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. ही लाेकशाही आहे की ठाेकशाही आहे असा सवालआंदाेलकांनी सरकारला विचारला आहे.

आमचा हक्क मिळावा यासाठी आम्ही लढणार. आम्ही शेवटपर्यंत लढा देणार असे महिला आंदाेलकांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीचा विराेध असताना देखील जबरदस्ती सुरु आहे. उदय सामंत  यांना लाेकशाही काय असते हे दाखवून देऊ असेही आंदाेलकांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply