Bangladesh Clashes : शेख हसीनांचा राजीनामा, बांगलादेश सोडून भारतात; बॉर्डरवर BSF अलर्ट

Bangladesh Clashes : बांगलादेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देत बांगलादेश सोडला असून त्या भारतामध्ये दाखल झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून त्या भारतामध्ये आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले आहेत. शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे म्हटले जात होते. पण आता त्या भारतामध्ये आल्याचे सांगितले जात आहे.

MP Wall Collapse : मातीचं शिवलिंग बनवत होते अचानक भयंकर घडलं, भिंत कोसळून ९ चिमुकल्यांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना!

मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला. त्यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडला आहे. त्यांचे हेलिकॉप्टर भारताकडे रवाना झाले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आरक्षणावरून महिनाभर सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर बांगलादेशमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला.

बांगलादेशमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लष्कराच्या टँक देशाच्या मोठ्या भागात फिरत आहेत. आंदोलक पंतप्रधान कार्यालयात घुसले आहेत. असे देखील सांगितले जात आहे की, लष्करानेच शेख हसीना यांचा राजीनामा मागितला होता. लष्करप्रमुखांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. लष्करप्रमुख काही वेळाने देशाला संबोधित करणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply