Ashadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उद्यापासून विठ्ठल रुक्मिणी दर्शन २४ तास सुरू राहणार

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला जाणार असून प्रत्येक मिनिटाला ३५ ते ४० भाविकांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. 

त्याचबरोबर भाविकांना पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी देवाचे सर्व राजोपचार बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढपूरात दाखल होतात. या भाविकांना विठुरायाचं दर्शन घडावं म्हणून २४ तास दर्शन सुरू करण्यात येतं.

उद्यापासून २४ तास दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. २० जून ते ७ जुलै दरम्यान भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे या काळात व्हीआयपी व ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे. आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते.

यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळं देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय महानाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. आषाढी वारीनिमित्त पंढपूरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

आषाढी एकादशी कधीपासून प्रारंभ?

आषाढी एकादशीचा प्रारंभ २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते समाप्तीः ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply