Aryan Khan Case : समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, 24 मेपर्यंत अटक न करण्याचे CBI ला निर्देश

Mumbai High Court : आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने समीर वानखेडे यांना 24 मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत. तसंच समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत कोर्टाचे संरक्षण मिळणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.

समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात  धाव घेत रिट पिटीशन दाखल केली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणी 24 मेपर्यंत तहकूब केली आहे.हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 24 मेपर्यंत अटक करु नका असे निर्देश सीबीआयला दिले. या सुनावणी वेळी कोर्टाने समीर वानखेडे यांना संरक्षण देखील दिले आहे.

हायकोर्टाने सीबीआयला याप्रकरणी समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबरच समीर वानखेडे यांनी सीबीआयला तपासात सहकार्य करावे असे देखील सांगण्यात आले. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 22 तारखेला सीबीआयला उत्तर देण्यास संगितले आहे. या सुनावणीवेळी विधिज्ञ रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा यांनी समीर वानखेडे यांची हायकोर्टात बाजू मांडली. दरम्यान, कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर समीर वानखेडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 'मला केंद्र सरकार आणि सीबीआयवर पूर्ण भरोसा आहे. ते मला नक्की न्याय देतील.' असा विश्वास व्यक्त केला.

तर समीर वानखेडेंचे वकील रिझवान मर्चंट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'समीर वानखेडे तपासात सहकार्य करणार आहेत. शाहरुख खानने समीर वानखेडेंशी मुलाच्या सुटकेसाठी व्हॉट्सअॅपवरुन विनंती केली होती. समीर वानखेडेंवर लावलेले आरोप हे खोटे आहेत. समीर वानखेडेंनी जो काही निर्णय घेतला होता तो ज्ञानेश्वर सिंग यांना सांगण्यात आला होता. ज्ञानेश्वर सिंग आणि वानखेडे या दोघांबरोबर शाहरुख खानचे चॅट झाले होते.'

तसंच, 'ज्ञानेश्वर यांच्या बरोबरच्या चॅटमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे. ज्ञानेश्वर यांना सुद्धा चौकशीला समोरे जावं लागेल. शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात पैशांबाबत काहीच बोलणं झालं नाही. वानखेडेंच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले होते. त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवाब मलिकांनी देखील वानखेडेंवर खोटे आरोप केले.', असे रिझवान मर्चंट यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply