Amravati News : मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले; अमरावतीत वातावरण तापलं

Amravati News :  मुंबईत मंत्रालयाला घेराव करण्यासाठी निघालेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलीसांनी अमरावतीत  अडवले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी काल रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी तुकडोजी महाराज मंदिरात रात्र काढली. विशेष म्हणजे, मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आल्याने मोर्शी येथील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. तर दुसरीकडे अमरावती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणात परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्यात आल्या नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर, आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आपण मुंबईत धडक देऊन मंत्रालयाला घेरावा घालणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना अमरावतीतच अडवले आहे. त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून आता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. 

Ravindra Waikar Case : ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड, सकाळपासून झाडाझडती

आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले...

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व गेटवर पोलीस तैनात असल्याचे चित्र आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते...

विशेष आपल्या मागण्यासाठी याच आंदोलक शेतकऱ्यांनी यापूर्वी मुंबई मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते.  त्याच्या या आंदोलनामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. अक्षरशः पोलिसांना स्वतः मंत्रालयाच्या जाळ्यावर उतरून आंदोलकांना ताब्यात घ्यावे लागले होते. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांनी मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी या आंदोलकांना मुंबईला जाण्यापासून रोखले आहेत. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागच्यावेळी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केल्याची घटना लक्षात घेता अमरावती पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वच गेटवर पोलीस तैनात असून, अधिकारी आणि कर्मचारी यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आतमध्ये सोडले जात आहे. तसेच, आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply