Amboli Ghat Accident: गोव्याहून परतताना काळाचा घाला! आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू

Amboli Ghat News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून रायबागमध्ये आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा आंबोली घाटातील दरीत कोसळून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मितीलेश पॅकेरा असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्तासाठी आले आहेत. सुट्टीचा मिळाल्यामुळे छत्तीसगड पोलिस म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले. वाटेत लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा पाय घसरून 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला.

याबाबतची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच आंबोली पोलिसांना दिली. काही वेळातच आंबोली पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मितीलेश यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला आहे. आज मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ते मितीलेश यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply