Air Pollution : न्यूयॉर्कमध्ये हवा प्रदूषणाचा उच्चांक, आभाळाचा रंगही बदलला! कॅनडामधील वणव्यांचा परिणाम

Air Pollution : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हवा प्रदूषणाची समस्या अगदी गंभीर झाली आहे. बुधवारी याठिकाणी प्रदूषणामुळे चक्क आभाळाचा रंगही केशरी झाला होता. यामुळे शहरातील नागरिकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं होतं. कॅनडामधील वणव्यांमुळे हे झालं असल्याचं म्हटलं जातंय.

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाने न्यूयॉर्क शहरासाठी एक एअर क्वालिटी हेल्थ अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं, आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

कॅनडातील वणव्यांचा परिणाम

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील हवेत राखेचे कण आढळून आले. वणव्यातील धुरामध्ये असणारे हे कण याठिकाणी आढळून आल्यामुळे, हे प्रदूषण कॅनडातील वणव्यांमुळे झालं असल्याचं म्हटलं जात आहे.

बुधवारी न्यूयॉर्क जगातील सर्वात प्रदूषित शहर होतं. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार न्यूयॉर्कमधील हवामानाची पातळी 350 - A एवढी होती. या पातळीला अत्यंत धोकादायक मानलं जातं. न्यूयॉर्कमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात हवा प्रदूषण पाहण्यात आलं नव्हतं.

खबरदारीची सूचना

न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंटने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, नाक आणि घशाचा त्रास, खोकला, शिंका, सर्दी आणि श्वास घेण्यास अडचण अशा तक्रारी जाणवू शकतील असं यात म्हटलं आहे. यासोबतच शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी नागरिकांना शक्य तितकं घरातच राहण्याचे आवाहन केलं आहे.

फ्लाईट्स रद्द

न्यूयॉर्कमध्ये प्रदूषणामुळे दाट धुक्याचा थर जमा झाला होता. यामुळे कित्येक फ्लाईट्स देखील रद्द करण्यात आल्या. तसेच, ब्रॉडवे शो देखील रद्द करण्यात आला.

१३ राज्यांमध्ये इशारा

कॅनडामध्ये सध्या ४०० पेक्षा अधिक वणवे पेटले आहेत. याचा गंभीर परिणाम अमेरिकेवर होत आहे. दाट धुक्याची ही चादर दक्षिण दिशेला वेगाने प्रवास करत आहे. त्यामुळे अमेरिकेतील १३ राज्यांना हवा प्रदूषणाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील आतापर्यंतचा हा सर्वात गंभीर वणवा आहे. आतापर्यंत तब्बल ६.७ मिलियन एकर जंगलामध्ये हा वणवा पसरला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply