मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातमध्ये ५०० कोटींच्या कोकेनची आयात, DRI ची मोठी कारवाई

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुजरातच्या बंदरावरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे सर्व ड्रग्ज इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले. विशेष म्हणजे मीठ असल्याचं सांगून या ड्रग्जची आयात करण्यात आली आहे.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मालवाहू जहाजावरून कोकेन जप्त करण्यात आले त्यात २५ मेट्रिक टनाच्या १००० मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, डीआरआयने २४ ते २६ मे या काळात केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात ५२ किलो कोकेन सापडलं.

डीआरआय या मालवाहू जहाजातील मिठाच्या बॅग तपासत असताना काही बॅगमध्ये एका वेगळ्या वासाचा पदार्थ असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. यानंतर या पदार्थाची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. तपासणीत या पदार्थांमध्ये कोकेनची मात्रा असल्याचं समोर आलं. यानंतर केलेल्या जप्तीच्या कारवाईत आतापर्यंत ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त झाले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, २०२१-२२ मध्ये डीआरआयने देशभरात कारवाई करत ३२१ किलो कोकेन जप्त केले होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३ हजार २०० कोटी रुपये होती. मागील एक महिन्यात डीआरआयने काही महत्त्वाचे गुन्हे दाखल केले आहेत. यात कांडला बंदरावर जिप्सम पावडरची आयात करताना २०५ किलो हेरॉईन ड्रग्जची तस्करी, पिपावाव बंदरावर ३९५ किलो हेरॉईन, दिल्ली विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ६२ किलो हेरॉईन, लक्षद्वीप बेटाच्या किनाऱ्यावर २१८ किलो हेरॉईनचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply