21 वर्षांनंतर चंदेरी गदेवर कोल्हापूरचे नाव पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

सातारा : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताब कोल्हापूरला कधी मिळणार, या प्रश्नाला पृथ्वीराज पाटील याने अखेर पूर्णविराम दिला. तब्बल एकवीस वर्षांनंतर त्याने कोल्हापूरला चांदीची गदा मिळवून दिली. हिंदकेसरी विनोद चौगुले याने २००० ला महाराष्ट्र केसरीची गदा मिळविल्यानंतर ते पटकाविण्याची किमया कोल्हापूरच्या पैलवानांना साधता आली नव्हती.

पृथ्वीराजचे मूळ गाव पन्हाळा तालुक्यातील देवठाणे. त्याचे आजोबा मारुती गणपती पाटील कुस्तीपटू. गावातल्या तालमीत त्यांनी तालमीत कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराजचे वडील बाबासाहेब पाटील यांना मात्र कुस्तीला झोकून देता आले नाही. शेती कामात त्यांना लक्ष घालावे लागले. मुलाने कुस्ती करावी, अशी त्यांची इच्छा होती. भाऊ संग्राम व धनाजी पाटील मोतीबाग तालमीतले नावाजलेले पैलवान. त्यांच्या जोडीला पृथ्वीराज २००९ ला मोतीबाग तालमीत दाखल झाला. महान भारत केसरी दादू चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुस्तीतला प्रवास सुरू झाला. त्याचा रोज कसून व्यायाम घेण्यात संग्राम व धनाजी कमी पडत नव्हते.

पृथ्वीराजने कुस्तीवर लक्ष केंद्रित केले. डावाचे तंत्र शिकून घेण्यावर भर दिला. त्यानंतर तो २०१४ ला शिंगणापुरातील शाहू कुस्ती केंद्रात दाखल झाला. प्रशिक्षक जालंदर मुंडे यांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले. ताकदीचा उपयोग कसा व कोठे करायचा, याचे तंत्र त्याने समजावून घेतले. प्रतिस्पर्धी पैलवान कोण आहे, याकडे लक्ष देणे त्याने टाळले. प्रतिस्पर्धी कोणीही असो, त्याला पराभूत करणे हेच त्याचे लक्ष राहिले. त्याची प्रचिती त्याने विविध स्पर्धांत दिली. त्याने २०२१ ला झालेल्या सिनियर नॅशनल स्पर्धेत सुवर्ण, तर २०२२ ला कास्यपदक पटकावले. ज्युनिअर नॅशनल स्पर्धेतही तो चमकला. खेलो इंडिया २०२० ला सुवर्णपदक मिळवून त्याने त्याच्यातील कौशल्य दाखवले. तो २०१९ ला महाराष्ट्र केसरीच्या मैदानात ९२ किलो गटातही उतरला होता. त्यातही त्याने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तो थेट महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी मैदानात उतरला आणि शौर्यभूमी साताऱ्यात कोल्हापूरच्या पैलवानाच्या अंगातील रग दाखवली.

महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावून त्याने कोल्हापूरची शान वाढवली. आर्मीत हवालदार पदावर काम करणारा पृथ्वीराज कोल्हापूरचा हिरो ठरला. मोतीबाग व शाहू कुस्ती संकुलाच्या लौकिकात त्याने भर घातली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply