२४ वर्षांनंतर काँग्रेसला मिळाले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष; मल्लिकार्जुन खर्गेंची बहुमताने निवड!

गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत असलेली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत ४०० हून जास्त मतं बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून खर्गेंचं अभिनंदन केलं आहे. “काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बननं ही एक मोठी सन्मानाची बाब आहे. पण त्यासोबतच ती एक मोठी जबाबदारीही आहे. माझी इच्छा आहे की मल्लिकार्जुन खर्गेंना यामध्ये यश मिळावं. मला मत देणाऱ्या एक हजाराहून अधिक काँग्रेसजनांचे मी आभार मानतो”, असं आपल्या ट्वीटमध्ये शशी थरूर म्हणाले आहेत.

दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधींची नेमकी भूमिका काय असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर बोलताना राहुल गांधींनी त्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. “काँग्रेसच्या अध्यक्षांनी काय निर्णय घ्यावा, यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझी काय भूमिका असेल, यावर मल्लिकार्जुन खर्गे निर्णय घेतील”, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसला तब्बल दोन तपांनंतर, अर्थात २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. याआधी सीताराम केसरी हे १९९६ ते १९९८ या काळात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते. त्यांच्यानंतर सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खर्गेंच्या रुपात काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचे अध्यक्ष मिळाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply