सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे नितीन गडकरी यांना खेड-शिवापूर टोलनाक्याबद्दल केली विनंती

खेड-शिवापूर - 'पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घालावे. तसेच हा टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर स्थलांतराबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात," अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.

पुणे-सातारा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे कारण देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 मार्चपासून एम.एच.12 आणि एम.एच.14 या वाहनांकडून पुन्हा टोलवसुली सुरू केली आहे. त्याला खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने आक्षेप घेतला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आणि टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर हलविण्यात यावा, या दोन मागण्या मान्य होईपर्यंत एम.एच.12 आणि एम.एच.14 च्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय होता. मात्र आता रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच टोलनाका स्थलांतराबाबत काहीही निर्णय झालेला नाही. तरीही सुरू केलेली टोलवसुली बेकायदा असल्याचे खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे म्हणणे आहे. सदर प्रकाराची माहिती समितीने सुळे यांना पत्राद्वारे दिली आहे.

त्याची दखल घेत खासदार सुळे यांनी याबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना ट्विट करून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

"पुणे सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत तसेच खेड-शिवापुर टोलनाका हा पीएमआरडीए हद्दीबाहेर हलविण्याचा निर्णय होईपर्यंत हवेली (पुणे शहर + पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यातील वाहनांना टोलमधून सूट देण्याचे ठेकेदाराचे पत्र आहे. मात्र रस्त्याचे काम अपूर्ण असतानाही संबंधित ठेकेदाराने टोलवसुली सुरू केली आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालावे. शिवापूर टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर घेऊन जाण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा," अशी विनंती त्यांनी गडकरी यांना ट्विटरद्वारे केली आहे.

"स्थानिकांकडून पुन्हा सुरू झालेली टोलवसुली आणि आमच्या मागण्या याबाबत खासदार सुळे यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. त्याची दखल घेत त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना त्याबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत ट्विट केले आहे. लवकरच त्यांच्याकडून गडकरी यांना याबाबत पत्रही देण्यात येणार आहे," असे खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply