साहेब कार्यालयात कर्मचारी घरी

पुणे : पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम सकाळी पावणे दहाला सुरू होते आणि सायंकाळी सव्वा सहा वाजता संपते. पण बहुतांश कर्मचारी उशिरा येतात आणि लवकरच निघून जातात. विशेष म्हणजे विभाग प्रमुख कार्यालयात काम करत असतानाही त्यांना किंवा इतर वरिष्ठांना कल्पना न देता घरी निघून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे साहेब कामावर अन कर्मचारी घरी अशी अवस्था महापालिकेत निर्माण झाली आहे.

राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढविण्यात आले. कोरोनाच्या पूर्वी प्रशासनाने बायोमॅट्रीक हजेरी मुख्य पालिका भवन, क्षेत्रीय कार्यालये व इतर ठिकाणी सुरू केली. त्यामुळे वेळेत येणे व कामाचे तास पूर्ण झाल्यानंतर जाणे अनिवार्य झाले. त्यामुळे कामकाजात शिस्त लागली होती. सध्या महापालिकेत कर्मचारी सकाळी पावणे दहा ऐवजी १० ते सव्वा दहाच्या दरम्यान हजर होतात व सायंकाळी पावणे सहा वाजल्यापासून घरी जाण्याची लगबग सुरू करतात. सहा वाजेपर्यंत बहुतांश कर्मचारी कार्यालयातून बाहेर पडलेले असतात. त्यामुळे एकूण कामाच्या किमान एक तास कर्मचारी कामच करत नाहीत.

सकाळी उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांकडून साइट व्हीजीटसाठी गेलो होतो असे वरिष्ठांना उत्तर दिले जाते. तर दुपारीही अनेकजण साइट व्हिजिट करून थेट घरी निघून जातात. त्यामुळे विभाग प्रमुखांकडून शिपायाला संबंधित कर्मचाऱ्याला बोलावले असता तो जागेवरच सापडत नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. काही विभाग प्रमुखांनी त्यांचे कर्मचारी बसतात त्या कार्यालयात सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यामुळे काही मोजके अधिकारी व कर्मचारी सोडता सर्वजण निघून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास येत असल्याने या कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावर पूर्णवेळ उपस्थित रहा अशी समज दिली आहे.

‘‘महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ कामावर असले पाहिजे. कर्मचारी लवकर जात असल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. कोरोनाही कमी झाल्याने पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरू केली जाईल. वरिष्ठांना न सांगता लवकर घरी जाणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply