सात वर्षांपूर्वी खून झालेली मुलगी सापडली जिवंत; आरोपी अजूनही तुरुंगात; कुटुंबीयांची कोर्टात धाव!

जवळपास सात वर्षांपूर्वी एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या खूनाची घटना चर्चेत येते…पोलीस प्रकरणाचा तातडीने तपास करतात.. मुलीच्या खूनाच्या प्रकरणात शेजारी राहणारा तरुण दोषी आढळतो… त्याच्यावर रीतसर खटला चालतो आणि त्याला खूनाच्या गुन्ह्याखाली शिक्षाही होते. पण सात वर्षांनंतर अचानक कुटुंबीयांच्या लक्षात येतं की ती मुलगी जिवंत आहे! एखाद्या चित्रपटाच्या कथानकात शोभेल अशी ही घटना उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये घडली आहे. मुलगी जिवंत असल्याचं सांगत तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली.

नेमकं घडलं काय?

सात वर्षांपूर्वी, अर्थात २०१५मध्ये अलिगढमध्ये या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार एका कुटुंबानं पोलिसांकडे केली होती. त्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांनी आग्र्यामध्ये त्याच वयाच्या आणि अंगकाठीच्या एका मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांना शंका आल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना ओळख करण्यासाठी आग्र्याला बोलावलं. तेव्हा वडिलांनी हीच आपली मुलगी असल्याची कबुली दिली. यानंतर प्रकरणाचा सविस्तर तपास करून मुलीच्या शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी मुलीचं अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात अटक केली.

प्रकरण न्यायालयासमोर गेलं आणि रीतसर सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे या प्रकरणात आरोपी गेल्या सात वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरू करावा लागला आहे. कारण यावेळी आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. जिच्या खुनाच्या आरोपांखाली मुलगा शिक्षा भोगत आहे, ती मुलगी हथरसमध्ये जिवंत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला.

मुलीनं हथरसमध्ये संसार थाटला!

ज्या मुलीचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं, ती मुलगी जिवंत असून हथरसमध्ये तिनं आपला संसार थाटला आहे. आता ही मुलगी २१ वर्षांची असून तिला दोन मुलंही आहेत, असा दावा आरोपीच्या कुटुंबीयांनी केला. यानंतर पोलिसांनी लागलीच हथरसमध्ये जाऊन मुलीला चौकशीसाठी अलिगढला आणलं. या मुलीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तिचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर आता पोलिसांनी या मुलीला अलिगढमधील प्रोटेक्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आता पुढे काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. आता तिची डीएनए चाचणीही केली जाणार आहे. यामध्ये जर ही तीच मुलगी असल्याचं निष्पन्न झालं, तर आरोपीचे कुटुंबीय आपल्या मुलाविरोधात लावण्यात आलेली कलमं रद्दबातल करण्याचा दावा करू शकतात. यासंदर्भात पोलिसांनीही दुजोरा दिला असून हे सिद्ध झालं, तर मुलाची सुटका होऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply