सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या ; कर्जबाजारीपणातून सामूहिक कृत्य केल्याचा संशय

सांगली : मिरजेपासून १२ किलोमीटरवरील म्हैसाळ गावी एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. कर्जबाजारीपणातून संपूर्ण कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय आहे.

म्हैसाळ गावाबाहेरील विस्तारित भागात पशुवैद्यक असलेले डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक असलेले पोपट वनमोरे यांचे बंगले आहेत. त्यापैकी डॉ. माणिक वनमोरे (वय ४९) यांच्या घरात त्यांच्यासह त्यांची आई आक्काताई (७२), पत्नी रेखा (४५), मुलगी प्रतिमा (२२), मुलगा आदित्य (१८) यांचे आणि शुभम पोपट वनमोरे (२८) अशा सहा जणांचे मृतदेह आढळले. तर शिक्षक असलेल्या पोपट वनमोरे (५२) यांच्या घरात त्यांच्यासह त्यांची पत्नी संगीता (४८) आणि मुलगी अर्चना वनमोरे (३०) यांचे मृतदेह आढळले. अर्चना नुकतीच एका बँकेत नोकरी करू लागली होती.

डॉ. वनमोरे यांच्या घरी दूध घालण्यासाठी आलेल्या तरुणामुळे ही घटना उघडकीस आली. त्यांचे घर आतून बंद असल्याने या तरुणाने शेजारी चौकशी केली. शेजारच्या रहिवासी आशा वनमोरे यांनी दरवाज्यातून आत पाहिले असता त्यांना धक्का बसला.  त्यांनी तात्काळ त्यांच्या मुलाला डॉ. वनमोरे यांचे भाऊ पोपट वनमोरे यांच्याकडे पाठवले असता तिथेही तिघांचे मृतदेह आढळले.

शिक्षक असलेल्या पोपट वनमोरे यांच्या घरी विषारी द्रव्याची बाटली आणि एक चिठ्ठी पोलिसांना आढळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

वनमोरे कुटुंबावर सुमारे एक कोटीचे कर्ज होते. त्याची परतफेड कशी करायची या विवंचनेत ते होते. त्यातूनच संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मात्र या घटनेमागे अन्य काही कारणे आहेत का, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply