संगमनेर : सुकेवाडी रस्त्यावरील कुटे वस्तीवर सशस्त्र दरोडेखारांचा धुमाकूळ! पंधरा तोळ्यांच्या दागिन्यांसह दीड लाख लुटले; इतर घरांना कड्या लावून तीन घरं फोडली.

संगमनेर : छोट्या-मोठ्या चोर्‍या, मोटार सायकल लांबविण्याचे प्रकार व गंठण चोरीच्या घटनांनी आधीच हैराण असलेल्या संगमनेरात आता सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे शहरालगतच्या सुकेवाडीत हे सिद्ध करणारा प्रकार घडला असून सशस्त्र दरोडेखोरांनी उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर हल्ला चढवित चाकू, लोखंडी टामी, पाईप अशा शस्त्रांचा धाक दाखवित तीन घरांमधून 15 तोळे वजनाचे व आणि सुमारे साडेतीन लाख रुपये सरकारी मूल्य असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाख रुपयांची रक्कम घेवून दरोडेखोरांनी पलायन केले. या घटनेने तालुक्यात दरोड्यांचे सत्र सुरु झाल्याचे बोलले जात असून नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज पहाटे शहरालगतच्या सुकेवाडीतील सुकेवाडी-कारखाना रस्त्यावरील उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीसह पावबाकी परिसरात घडली. या परिसरात पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत कुटे वस्तीवरील एका रेषेत असलेल्या आठातील सात घरांना बाहेरुन कड्या लावून उत्तमराव कुटे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी कुटे यांच्या मानेला चाकू लावून ऐवज काढून देण्याचा दम भरला. त्यामुळे कुटे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडील दहा तोळ्यांहून अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास सव्वा लाखांची रक्कम ओरबाडून घेतली.

यावेळी या दरोडेखोरांनी कपाटातील ऐवजासह महिला व मुलांच्या अंगावरील दागिनेही ओरबाडून घेतले. हा गदारोळ सुरु असतांना आसपासच्या घरातील नागरीकही जागे झाले. मात्र दरोडेखोरांनी सगळ्यांच्या घराला बाहेरुन कड्या लावल्याने कोणालाही मदतीसाठी येता आले नाही. जवळपास अर्धातास या वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरु होता. या दरम्यान त्यांनी लष्करात सेवेला असलेल्या दातीर या जवानाच्या घरावरही दरोडा घातला, यावेळी जवान दातीर हे कर्तव्यावर गेलेले होते तर त्यांच्या घरात केवळ त्यांची पत्नी व मुले होती. याच वस्तीवरील एका म्हातारीकडे शेळ्या विकून आलेले पैसेही दरोडेखोरांनी ओरबाडले.

हा सगळा प्रकार सुरु असतांना सुकेवाडीचे उपसरपंच सुभाष कुटे यांनी आपल्या खिडकीतून चोरऽ.. चोरऽ अशी ओरड करण्यास सुरुवात केल्याने दरोडेखोरांच्या टोळीतील एका साडेसहा फूटांहून अधिक उंच असलेल्या चोरट्याने आपल्या हातातील लोखंडी पहार उगारुन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. येथून पुढे जाताना चोरट्यांनी पेशाने वाहनचालक असलेल्या सुनील नाईकवाडी यांच्या घरावरही दरोडा घालून सोन्याचे दागिने व रोकड लुटून नेली. जवळपास अर्धातास सुरु असलेल्या या प्रकारानंतर दरोडेखोर निघून गेले. त्यानंतर इतरांना फोन करुन बोलावून घेत बाहेरुन लावलेल्या कड्या उघडण्यात आल्या.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. दरोडेखोर जेव्हा कुटे वस्तीवर आले त्यावेळी ते सर्वजण तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याबाबत पोलिसांनी सुनील नाईकवाडी यांना फिर्यादी करुन त्यांच्याच तक्रारीत अन्य दरोड्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार साडेतीन ताळे वजनाचे गंठण, दीड तोळ्याचा रत्नहार असा 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल, पाच तोळे वजनाचे गंठण, एक तोळ्याची कर्णफुले, दीड तोळ्याची चेन व मंगळसूत्र असा 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल, दीड व अर्धा तोळ्याची पोत, अर्धा तोळ्याचा हार, दोन हजारांचा मोबाईल व 1 लाख 55 हजार रुपये रोख असा एकूण 4 लाख 92 हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लांबविला आहे. या घटनेने शहरासह ग्रामीण भागात दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply