शिवसेनेवर उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव जबाबदार – नारायण राणे

सावंतवाडी : शिवसेनेवर आज उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केली. 

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने कोणते प्रश्न सोडवले असा प्रश्न उपस्थित करत नवीन सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच लोककल्याणकारी राज्य बनवण्यासाठी काम करेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड गप्प करावे. ज्यांना मुख्यमंत्री असतानासुद्धा स्वत:चे आमदार सांभाळता  येऊ शकले नाहीत, ते मतदार काय सांभाळणार, महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले हे सांगा. उलट नारायण राणे यांच्या घरांला नोटीस बजाविण्याचे काम त्यांनी केले. अडीच वर्षांमध्ये स्वत:च्या आमदार- खासदारांना आठ आठ तास भेटण्यासाठी ताटकळत ठेवायचे, त्यांची कामे करायची नाहीत,  केवळ मातोश्रीच्या आप्तांचीच कामे करायची हा एककलमी भ्रष्टाचार त्यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply