"वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबाबत चौकशी व्हावी. कारण त्यांनी सहकार्य केलं असतं,तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

पालघर येथील रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर अफताब पूनावाला याने दिल्लीत तिचा निर्घृण खून केला आहे. नराधम आरोपीनं श्रद्धाचे मृतदेहाचे ३५ तुकडे करून विविध परिसरात फेकले आहेत. खूनाच्या या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अफताब पूनावाला यांस अटक केली असून तो सध्या तिहार तुरुंगात आहे.

या घटनाक्रमानंतर मृत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीच्या काळात पोलिसांनी आपल्याला योग्य ते सहकार्य केलं नाही. त्यामुळे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी पोलिसांनी दखल घेतली असती, तर माझी मुलगी आज जिवंत असती, असा आरोप विकास वालकर यांनी केला आहे.

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर पत्रकार परिषदेत म्हणाले, “माझी मुलगी श्रद्धा वालकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अत्यंत दु:ख झालं आहे. हे दु:ख आम्ही कधीच विसरू शकणार नाही. माझी प्रकृती थोडी खराब असून मी शक्य होईल, तेवढंच तुमच्याशी बोलणार आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस व वसई पोलीस यांच्याकडून संयुक्त तपास व्यवस्थितपणे सुरू आहे.”

पोलिसांवर गंभीर आरोप करताना विकास वालकर म्हणाले, “अगदी सुरुवातीला वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबाबत चौकशी व्हावी. कारण त्यांनी सहकार्य केलं असतं, तर माझी मुलगी आज जिवंत असती. काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. माझ्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य लाभलं आहे. माझा न्यायव्यवस्थेनर संपूर्ण विश्वास आहे.”

“अफताब पूनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेनं हत्या केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी. तसेच त्याचे आई-वडील आणि भाऊ यांचीही सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. या कटामध्ये इतर कुणी सामील असेल तर त्यांचीही चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मी अपेक्षा करतो,” असंही वालकर म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply