वर्षभर बटाटा तेजीत राहण्याची शक्यता ; उत्तरेकडील राज्यात लागवड कमी

पुणे : उत्तर प्रदेशातून होणारी बटाटय़ाची आवक कमी होत असल्याने बटाटय़ाच्या दरात वाढ होत आहे. आग्रा येथील शीतगृहातून सध्या बटाटय़ाची आवक होत असून यंदाच्या वर्षी बटाटय़ाचे दर तेजीत राहणार आहेत. किरकोळ बाजारात एक किलो बटाटय़ाचे दर प्रतवारीनुसार ३० ते ४० रुपये दर आहेत.

बटाटय़ाची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशात होते. शीतगृहात बटाटा साठविण्यात येतो. शीतगृहातून आग्रा, इंदूर येथील बाजारपेठेतून देशभरात बटाटा विक्रीस पाठविण्यात येतो. आग्रा, इंदूर येथील बाजारपेठेतील घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो बटाटय़ाला १८ ते २० रुपये दर मिळाला आहे. आग्रा येथील बटाटय़ाची आवक कमी झाल्याने सध्या बाजारात बटाटय़ाला चांगले दर मिळत असून किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये दराने विक्री केली जात असल्याचे मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील मंचर, खेड, शिरूर तसेच नाशिकमधून बाजारात बटाटय़ाची आवक होते. मागणीच्या तुलनेत स्थानिक बटाटाटय़ाची आवक कमी पडते. त्यामुळे परराज्यातील बटाटय़ाला वर्षभर मागणी असते. बाजारात सध्या नाशिकमधील बटाटय़ाची आवक होत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून मिळून साधारणपणे २० ते २५ ट्रक बटाटय़ाची आवक होत आहे. एका गाडीत साधारणपणे २० टन (४०० पिशव्या) असतात.

वकाळी पावसाचा गावरान बटाटय़ाला फटकामध्यंतरी पुणे विभागातील खेड, मंचर भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे गावरान बटाटय़ाच्या लागवडीवर परिणाम झाल्याने सध्या बाजारात बटाटय़ाचा तुटवडा जाणवत असून परिणामी किरकोळ बाजारात वाढ झाली आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

उत्तरेकडील राज्यात बटाटा लागवड २० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे बटाटय़ाचे दर यंदा वर्षभर तेजीत राहणार आहेत. किरकोळ बाजारात बटाटय़ाचे दर साधारणपणे ३० ते ४० रुपये आहेत. परराज्यातील घाऊक बाजारात जागेवर एक किलो बटाटय़ाचे दर १८ ते २० रुपये आहेत. वाहतूक खर्च तसेच अन्य खर्च विचारात घेता किरकोळ बाजारात बटाटय़ाचे दर तेजीत राहणार आहेत.

– राजेंद्र कोरपे, बटाटा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply